रामदास तांबेंना पुन्हा एकदा डावलले

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघातील बांधकामांना पाणी पुरवठ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यावरून अडचणीत सापडलेले पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांना अतिरिक्त पदभार देताना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी याच विभागातील प्रवीण लडकत यांच्या नावाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पसंती दर्शविली आहे.

महापालिका सेवेतील कार्यकारी अभियंता विशाल कांबळे हे 11 नोव्हेंबर 2018 ला सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडे असलेला पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभागाअंतर्गत सेक्‍टर क्रमांक 23 मध्ये असलेल्या जलशुद्दीकरण केंद्राचा पदभार सोपविण्यात आला होता. मात्र, कांबळे यांच्या सेवानिवृत्तीमुळे प्रशासकीय कामकाजाच्या सोयीकरिता त्यांच्याकडे असलेला पदभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपविणे आवश्‍यक होते. महापालिका आस्थापनेवर कार्यकारी अभियंता संवर्गाची एकूण 18 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 16 पदे भरलेली असून, उर्वरित दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचा प्रवीण लडकत यांचा अनुभव लक्षात घेता, त्याच्याकडे या कामाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने, पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये, याकरिता नव्याने होणाऱ्या गृहप्रकल्पांच्या बांधकामांना तात्पुरत्या कालावधीकरिता “ना हरकत प्रमाणपत्र’ न देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला होता. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असताना, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्वयंनिर्णयाचे तत्व अवलंबत, कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी या भागातील बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्र देणे बंद केले. त्यावर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी जोरदार हरकत घेतली होती. तांबे यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत, काही बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता.

याच कारणावरून चिंचवडचे आमदार लक्षमण जगताप आणि राहल कलाटे यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. तसेच याच विषयाचा आधार घेत, महापालिका मुख्यालयातील तांबे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत, राहुल कलाटे यांनी या विषयाची सर्व माहिती देण्याची आग्रही मागणी केली. रात्री उशिरापर्यंत हे ठिय्या आंदोलन झाल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. याच दिवशी आयुक्तांनी तांबे यांच्याकडे सहशहर अभियंता पदाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार सोपविला होता. मात्र, कलाटे यांच्या आंदोलनानंतर काही तासांतच हा अतिरिक्त पदभार काढून घेतला होता. तसे या प्रकरणाबाबत तांबे यांची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, विशाल कांबळे यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या अतिरिक्त पदभार सोपविताना रामदास तांबे यांच्याऐवजी याच विभागात काम करणारे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्या नावाला पसंती दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)