रामजन्म आणि रामाचा पाळणा

आज रामनवमी. भगवान रामाचा जन्मदिवस. सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही, तर परदेशांतही जिथे भारतीय आहेत तिथे तिथे रामनवमी साजरी केली जाते. अगदी धूमधडाक्‍यात.

भगवान राम आणि भगवान कृष्ण ही आपल्या सर्वांची अगदी आवडती दैवते. आपल्या जीवनात अगदी पूर्णपणे भिनून गेलेली. राम हा भगवान विष्णूंचा सातवा अवतार आणि कृष्ण आठवा अवतार. दोघांचेही जन्मदिवस आपण मोठ्या हर्षोल्लासाने साजरे करतो. रामाचा जन्म रामनवमीला आणि कृष्णाचा जन्म कृष्णाष्टमीला म्हणजे गोकुळ अष्टमीला. राम जन्मला भर दुपारी 12 वाजता, तर कृष्ण जन्मला मध्यरात्री 12 वाजता. रामाचा जन्म राजवाड्यात, तर कृष्णाचा जन्म बंदिखान्यात. रामाचा जन्म भर दुपारी सूर्य माथ्यावर आला असताना, रणरणत्या उन्हात, जिवाची काहिली होत असताना, तर कृष्णचा जन्म मध्यरात्रीच्या काळोखात, मुसळधार पाऊस पडत असताना, विजा लखलखत असताना. त्यांच्या जन्मवेळा आणि जन्मठिकाणे यांनाही मोठा अर्थ आहे. हे प्रतीकात्मक आहे. पण या अशा प्रतिकूल परिस्थितीत, सारे वातावरण भयावह असताना. त्या त्या वातावरणातून-परिस्थितीतून त्यांनी मानवाला सोडवले.

चैत्र शुद्ध नवमीला रामाचा जन्म झाला. रामजन्म सर्वच राममंदिरांमध्ये साजरा केला जातो. रामाला पाळण्यात घातले जाते, पाळणे म्हटले जातात आणि मग सुंठवडाही वाटला जातो.
रामजन्मासाठी आम्ही लहानपणी तुळशीबागेत जायचो त्याची मला चांगली आठवण आहे. तेव्हा वाड्यातील साऱ्या बायका(तेव्हा बायकांना बायकाच म्हणायचे, त्यांच्या महिला झाल्या नव्हत्या) सर्व छोट्यामोठ्या मुलाबाळाना घेऊन तुळशी बागेत जायच्या. तेथे पाय ठेवायला जागा नसायची. पण तशा गर्दीतून घुसत आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करायचो. फुलांनी सजवललेल्या पाळण्यात रामाची मूर्ती असायची. तेव्हा सारी तुळशीबाग फुलांनी सजवली जायची. त्या वातावरणात कोणताही भपकेबाजपणा नसायचा. एक भक्तिभावाचा गंध असायचा त्या वातावरणाला. रामाचे अभंग म्हटले जायचे.

उत्तम हा चैत्रमास ऋतू वसंताचा दिवस
शुद्ध पक्षी ही नवमी उभे सुरवर हे व्योमी
माध्यानावरी दिनकर पळभरी होय स्थिर
असा एक अभंग त्यात होता. नंतर रामाची मूर्ती फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेवून तिला झोके दिले जायचे. आणि रामाचा पाळणा म्हटला जायचा. रामाच्या पाळण्याला हात लागला नाही, तरी रामाचा पाळणा म्हणायला सर्वांचा सूर लागायचा. रामजन्म झाल्यावर फुले उधळली जायची. सुंठवड्याचा प्रसाद घेऊन घरी परततानाही मनात भक्तिभाव असायचा. मुखी रामनामाचा जप असायचा. घरी परत येताना वाटेत दुसरे एक राममंदिर होते, त्या मंदिरात जाऊन आम्ही तिथला प्रसादही घेऊन यायचो.

घरी परत येत असतानाही वाड्यातल्या काही म्हाताऱ्या बायका रामाचा पाऴणा म्हणायच्या. त्यांनी अगदी एकासुरात काहीशा थरथरत्या आवाजात म्हटलेला रामाचा पाळणा मला अजूनही आठवतो,
जो जो रे जो जो रे….
कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा
मनमोहना रामा लक्षुमणा निद्रा करी बाळा….
घरी आल्यानंतरही साऱ्या बायका एकत्र बसायच्या, कोणाच्या तरी घरी आणि मग गप्पागोष्टी सुरू व्हायच्या. विषय अर्थातच रामाचा, मग रामायणातील गोष्टी सांगितल्या जायच्या. कोणाकोणाच्या बारशाच्या आठवणी सांगितल्या जायच्या. आमच्या वाड्यात कृष्णाबाई म्हणून एक बाई होत्या. त्यांचा मुलगा रामनवमीलाच जन्मला होता. त्याचे खूप कौतुक चालायचे. रामनवमीला जन्मला म्हणून त्याच नाव रामचंद्र असेच ठेवले होते.

त्याच्या बारशाची आठवण मला चांगली आहे. मी अगदी जवळून पाहिलेले ते पहिलेच बारसे.
त्याचा पाऴणाही फुलांनी सजवला होता. बाळाला पाळण्यात ठेवण्यापूर्वी त्यात एक वरवंटा ठेवला होता हे मला चांगले आठवते. का, हे माहीत नाही, पण होता, पाळण्यातला वरवंटा एका बाईने काढून घेतल्यानंतर त्यात बाळाला ठेवले. नंतर कुणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या म्हणत पाळण्याच्या दोन बाजूला उभ्या बायकांनी बाळाला पाळण्याच्या खालूनवरून फिरवत एकमेकीच्या हातात दिले.

नंतर त्याला पुन्हा पाळण्यात ठेवून त्याच्या मावशीने त्याच्या कानात त्याचे हळूच नाव सांगितले आणि कुर्रर्र।।। केले. झाले बारसे. नंतर मग वेगवेगळे पाळणे म्हटले. त्यात रामाचा पाळणा होता, कृष्णाचा पाळणा होता आणि शिवाजीचाही पाळणा होता आता मात्र तशी बारशी होत नाहीत आणि तसे पाळणे ऐकायला मिळत नाहीत. अपवाद फक्त रामजन्माचा.

नीलिमा पवार 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)