नवी दिल्ली – देशात सध्या गाजत असलेल्या राफेल प्रकरणी अनिल अंबानी यांनी कॉंग्रेसला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. राफेल व्यवहारासंबंधी कॉंग्रेस पक्ष मोदी सरकारवर सतत टीका करत आहे. या प्रकरणात मोदी सरकारला घेरताना त्यात अनिल अंबानी यांच्या कंपनीचे नावही घेतले जात आहे. त्यावरून नाराज झालेल्या अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांना गेल्या आठवड्यात पत्र पाठवले होते. त्यानंतर पुढील कारवाई म्हणून अनिल अंबानी यांनी आता कॉग्रेसच्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

रणदीप सूरजेवाला, अशोक चव्हाण, संजय निरुपम, अभिषेक मनू आणि अन्य नेते चुकीच्या माहितीवरून आपल्यावर आणि आपल्या समूहावर आरोप करत आहेत. रिलायन्स समूहाने हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करून नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे, की सर्व नेत्यांना स्वातंत्र्याचा अधिकार जरूर आहे, पण त्यांनी जबाबदारीने आणि सत्यास धरून बोलले पाहिजे. कॉंग्रेस पक्षाने माझ्या आणि माझ्या समूहाच्या विरोधात जणू एक मोहीमच चालवली आहे, असे वाटत आहे.

राफेल व्यवहाराबाबत कॉंग्रेसकडे असलेली माहिती पूर्णत: चुकीची आहे. त्यातील तथ्यांबाबत गोंधळ आहे. आपल्या कंपनीच्या हजारो कोटींच्या फायद्याची गोष्ट पूर्णत: खोटी असल्याबाबत मागील आठवड्यात अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले होते.

36 राफेल विमानांची निर्मिती पूर्णत: फ्रान्समध्येच होणार आहे, रिलायन्स आणि फ्रान्सची कंपनी मिळून त्यांची निर्मिती करणार नाही. त्यामुळे आपल्या कंपनीवर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. ही गोष्ट अनिल अंबानी यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातही पत्र लिहून कळवली होती. एका कंपनीच्या फायद्यासाठीच सरकारने या व्यवहारात बदल केल्याचा आरोप राहुल गांधी यूपीए सरकारवर करत आहेत.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)