राफेल घोटाळ्यावर स्वतंत्र टास्कफोर्स

राहुल गांधींनी केली सहा जणांची निवड
नवी दिल्ली – मोदी सरकारच्या राफेल घोटाळा प्रकरणावर सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत सहा जणांच्या स्वतंत्र टास्कफोर्सची स्थापना पक्षात केली आहे. हे सहा सदस्य त्यांनी व्यक्तिगत लक्ष घालून निवडले आहेत. माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी हे या टास्कफोर्सचे प्रमुख असतील. त्यात रणदिप सुर्जेवाला, अर्जून मोदवाडीया, शक्‍तिसिंह गोहील, प्रियांका चतुर्वेदी, जयवीर शेरगील, पवन खेरा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

राफेल विमान खरेदीत मोदी सरकारने 36 हजार कोटी रूपयांचा घोटाळा केला असून संरक्षण खरेदीतील हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. मोदी सरकारने कॉंग्रेसचा हा आरोप फेटाळून लावला आहे. तथापी राफेल खरेदीची किंमत मात्र त्यांनी जाहीर केलेली नाही. गुप्तता कराराअंतर्गत हा खरेदी करार केला असल्याने त्याच्या किंमती जाहीर केल्या जाऊ शकत नाहीत असे सरकारने म्हटले असले तरी कॉंग्रेसने मात्र या प्रकरणावरून मोदींचा पिच्छा पुरवण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.

या सहा जणांच्या स्वतंत्र डेस्क खेरीज कॉंग्रेसने पक्षाच्या 50 नेत्यांना या प्रकरणी पत्रकार परिषदा घेण्याची अनुमती दिली असून देशातील शंभर शहरांमध्ये जाऊन हे नेते राफेलवर पत्रकार परिषदा घेतील. 14 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे घेतलेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी मोदींना या प्रकरणी आपल्याशी संसदेत जाहीर चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. चौकीदार नही भागीदार है अशा शब्दात अलिकडेच राहुल गांधी यांनी मोदींवर या प्रकरणी संसदेत निशाणा साधला होता.

भाजपकडून या विषयी सातत्याने मौन बाळगले जात आहे. त्यातून हा विषय दुर्लक्षित करण्याचा त्यांचा मनोदय असला तरी कॉंग्रेस मात्र आता अत्यंत आक्रमक झाली असल्याने त्यावर मोदी सरकार कसा बचाव करणार याविषयी औत्स्युक्‍य निर्माण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)