राफेल करारात मध्यस्थ झाला नाही

प्रकाश जावडेकरांचा कॉंग्रेसवर पलटवार
सातारा – कॉंग्रेसने मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच केलेला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच कॉंग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. आता ते त्यात नवनवे मुद्दे शोधत आहेत. पण रोज राफेल राफेल म्हणून शंभर वेळा खोटे बोलून ते खरे होऊ शकत नाही. असा पलटवार मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे केला.

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या शुभारंभासाठी जावडेकर साताऱ्यात आले होते. कार्यक्रमानंतर शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. राफेल प्रकरणात काही तथ्य नसल्याचा दावा करत ते म्हणाले, रोज राफेल राफेल म्हणून शंभर वेळा खोटे बोलून ते खरे होऊ शकत नाही, तरीपण खोट बोल पण रेटून बोल याचा अट्टाहास कॉंग्रेस सोडत नाही. एखादी गोष्ट सत्य नसेल तर ते टिकू शकत नाही. राफेल करारात कोणी मध्यस्त नाही. कॉंग्रेसचे दु:ख असे आहे, की त्यांनी मध्यस्थाशिवाय कधी व्यवहारच केला नाही.

भाजप विरोधकांना कोणताही मुद्दा हाताशी मिळत नसल्याने नसलेले मुद्दे चर्चेत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण शेतकऱ्यांपासून, गरीबापासून सामान्य जनतेपर्यंत मोदींच्या विकास योजनांचा फायदा होत असल्याने लोक आमच्यासोबत आहेत. राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघातील लोकच आता आम्ही मोदींच्या बरोबर असल्याचे सांगत आहेत, असे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या राज्यातील 270 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये 200 ग्रामपंचायती आम्हाला मिळाल्या आहेत. त्यामुळे लाट केवळ 2014 ची नव्हती, तर गेल्या चारही वर्षात सर्व निवडणुकात भाजपची वाढ झाली आहे. सर्वसामान्य जनतेला सुशासन हवे आहे. जातीपातीच्या राजकारणाला लोक बळी पडत नाहीत. तसेच खोटेनाटे प्रचार करून लोक मते देत नाहीत हे दिसून आले आहे. त्यामुळे भाजप विरोधकांची लोकांच्यातील मान्यता संपुष्टात येत आहे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)