राफेल करारच रद्द करण्याची कॉंग्रेसची मागणी

जम्मू: राफेल विमान खरेदीत मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याने हा करारच रद्द करावा अशी मागणी कॉंग्रेस नेते खासदार प्रतापसिंह बाजवा यांनी आज केली. या घोटाळ्यातून भाजपला थेट लाभ झाला आहे असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणावर सातत्याने जाहीर आरोप होत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन गप्प का आहेत असा सवाल त्यांनी केला.

ते म्हणाले की ही विमाने खरेदी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून निविदा मागवण्यात आल्या होत्या. 12 ऑक्‍टोबर 2912 रोजी या निवीदा उघडण्यात आल्या त्यावेळी राफेल विमानांची किंमत 526 कोटी 10 लाख रूपये इतकी नोंदवण्यात आली होती. त्यानुसार युपीए सरकारने ही विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. एकूण 126 विमाने खरेदी केली जाणार होती त्यातील 18 विमाने तयार स्थितीत संबंधीत कंपनीने द्यावीत आणि उर्वरीत 108 विमानांची जुळणी भारत सरकारच्या मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स कंपनीत करण्यात यावी असे ठरले होते. त्यावेळी ठरलेल्या किंमतीनुसार 36 विमानांसाठी 18 हजार 940 कोटी रूपये इतका खर्च येतो.

पण मोदींनी हीच विमाने 1670 कोटी 70 लाख रूपयांना एक विमान या दराने खरेदी केली आहेत. मोदींनी या विमानांसाठी 41 हजार 205 कोटी रूपये जादा मोजले आहेत. यातून कोणाचा लाभ झाला हे मोदींनी स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी दिले. विमानांच्या करारात जो सिक्रेसी क्‍लॉज आहे त्यातून विमानांची खरेदी किंमत जाहीर करण्यात कोणतीही बाधा येऊ शकत नाही असे ते म्हणाले. बोफोर्स खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर कॉंग्रेसने संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमली होती तशी समिती राफेल बाबत नेमण्यास मोदी सरकार का टाळाटाळ करीत आहे असा सवालही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)