डोंगर पायथ्याची शेती पूर्णतः धोक्यात
कवठे, दि. 28 (प्रतिनिधी) – वाई तालुक्यातील कवठेसह वाहगाव, बोपेगाव या गावातील शेतकऱ्यांची डोंगर पायथ्याला असलेल्या शेतीचे डुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गत काही दिवसांपासून या परिसरात डुकरांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. डुकरांमुळे होत असलेल्या शेतीच्या नुकसानामुळे शेतकरीवर्ग पुरता संकटात सापडला आहेत.
महामार्गाच्या पूर्वेस असलेल्या कवठे, वहागाव, बोपेगाव या गावातील शेतकऱ्यांच्या बहुतांशी जमिनी डोंगराच्या पायथ्याला आहेत. सध्या या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या उभारल्या आहेत. सतत फिरणाऱ्या या पवनचक्क्यांमुळे डोंगर परिसरातील जंगली श्वापदे गावठाण परिसरात येऊ लागली आहेत. विशेष म्हणजे या डोंगरामध्ये डुकरांचे मोठे प्रमाण आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या परिसरातील रब्बीचे पिके जोमात आली आहेत. मात्र, डुकरे या पिकांत घुसूत असल्याने पिके जमिनदोस्त होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुळातच या भागातील परिस्थिती ही दुष्काळजन्य आहेत. त्यातही आता चांगल्या प्रकारे आलेल्या पिकांचे डुकरांकडून नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
डोंगर पायथ्याला माझी दोन एकर शेती आहे. त्यामध्ये सध्या ऊसाचे पिक आहे. परंतु, गत काही दिवसांपासून डुकरांनी ऊस शेतीमध्ये अक्षरश: धुडगूस घालून संपूर्ण ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे सुमारे 50 ते 60 टनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वनविभागाने या डुकरांचा बंदोबस्त करावा.
चंद्रकांत सदाशिव मोरे, कवठे
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा