रात्री उशिरापर्यंत देखावे पहाण्यासाठी गर्दी

फुटका तलाव गणेश मंडळाच्या मोडेन पण वाकणार नाही देखाव्यास प्रतिसाद

सातारा: साताऱ्याचा पारंपारिक गणेशोत्सव गौरी विसर्जनानंतर उत्तरार्धाकडे निघाला आहे. मोहरमची सुट्टी साधत आणि विकेंडचा कार्यक्रम ठरवणाऱ्या सातारकरांनी श्री दर्शनासाठी शहरामध्ये गर्दी करायला सुरूवात केली आहे. ग्रेड सेपरेटरने शहराचा घसा आवळला असला तरी सातारकरांच्या उत्साहामध्ये तसुभरही फरक पडलेला नाही. जिवंत देखाव्यांपासून ते मनात भरणाऱ्या आकर्षक श्री दर्शनापर्यंत सातारकरांनी रात्री जागवत शहराला यात्रेचे स्वरूप दिले आहे. दरवर्षी सातारा शहरात आकर्षणाचा विषय असणाऱ्या फुटका तलाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदानाचा ऐतिहासिक प्रसंग मोडेन पण वाकणार नाही या दृष्यातून जिवंत केला आहे. या जिवंत देखाव्यासाठी सातारकरांची गर्दी होत असून मोती चौक ते फुटका तलाव या रस्त्याने बुधवारी रात्री प्रचंड ट्रॅंफिक जामचा अनुभव घेतला.

-Ads-

ऐतिहासिक सातारा शहराच्या अनेक गणेशोत्सव मंडळांना शतकी परंपरा आहे. पाच दिवसाचे घरगुती गणपती आणि गौरी विसर्जनानंतर सातारा शहरात सार्वजनिक गणपतींचे देखावे खुले होतात. त्यामुळे सातारकरांची गर्दी रस्त्यांवर दिसू लागली आहे. रात्री उशीरापर्यंत मंडळांचे कार्यकर्ते देखावे खुले ठेवत असल्याने त्या देखाव्यांचा आनंद घेण्यासाठी पोवई नाक्‍यापासून ते राजवाड्यापर्यंत आणि मोळाच्या ओढ्यापासून ते बोगद्यापर्यंत सर्वत्र सातारकरांमुळे रात्री साडे अकरापर्यंत रस्ते गर्दीने फुलून जावू लागले आहेत. प्रबोधनात्मक देखावे, जिवंत देखावे, कुठे विद्युत रोषणाई, तर कुठे भव्य श्री मुर्ती असे पारंपारिक वैविध्य साताऱ्याच्या गणेशोत्सवात पाहायला मिळते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही.

पण गर्दी खेचली आहे ती फुटक्‍या तलावाच्या गणेश उत्सव मंडळाने. मोडेन पण वाकणार नाही. या सदरामध्ये शिवचरित्रातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचा ऐतिहासिक प्रसंग सध्या गणेश भक्‍तांच्या अंगावर रोमांच निर्माण करत आहे. आकर्षक प्रकाश योजना, कलाकारांचा बहारदार अभिनय आणि थेट शिवकालाची आठवण करून देणारे नेपथ्य यामुळे हा देखावा डोळ्याचे पारणे फेडतो आहे. पोवई नाक्‍यावरून थोडीशी वाट वाकडी करून सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्यास साताऱ्यात श्री क्षेत्र महाबळेश्‍वर अवतरल्याचा भास होतो. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, भागिरथी या नद्यांच्या उगमाचा सुंदर देखावा या मंडळाने सादर केला आहे. या देखाव्याला सुध्दा नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे.

याशिवाय रविवार पेठेतील राजा, पंताच्या गोटातील राजा, केसरकर पेठेतील मयुर सोशल ग्रुपचा केसरकर पेठेचा राजा, मोती चौकातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रकाश मंडळ, गुरूवार पेठेतील शकुनी गणेश उत्सव मंडळ, गुरूवार तालीम, शनिवार पेठेतील शनि गणेश मंडळ, राजपथावरील मारवाडी गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठेतील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ, शेटे चौकातील शंकर पार्वती मित्र मंडळ, प्रतापगंज पेठेतील नृसिंह मंडळ, राजवाडा परिसरातील सम्राट मित्र मंडळ या विविध मंडळांच्या आकर्षक व भव्य गणेश मुर्ती गणेश भक्‍तांचे आकर्षण ठरत आहेत.

जिल्हा पोलिसांची करडी नजर
सातारा शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या सातारा जिल्हा पोलिसांचा चोख बंदोबस्त साताऱ्यात आहे. पोवई नाका ते राजवाडा या दरम्यान 200 हून अधिक मंडळांच्या परिसरात पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरांची सोय करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी विसर्जन मोहिमेच्या निमित्ताने सातारा शहरातून डॉल्बी विरोधात रॅली काढून बंदोबस्ताचा आढावा घेतला. अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन डीवायएसपी एक आरसीपी सुमारे 600 कर्मचारी आणि राज्य राखीव दलाची एक स्वतंत्र तुकडी असा जय्यत बंदोबस्त गणेशोत्सव सोहळ्याला देण्यात आला आहे. गर्दीमध्ये हात मारणाऱ्या चकटफू चोरट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे बारकाईने लक्ष असून त्यांचेही एक पथक गणेशोत्सवात गोपनियररित्या सक्रिय आहे.

साताऱ्यात कुठे काय बघाल?
फुटका तलाव (सोमवार पेठ), मोडेन पण वाकणार नाही
मारवाडी गणेशोत्सव मंडळ (भवानी पेठ) राजमहाल
सार्वजनिक बांधकाम विभाग (रविवार पेठ) श्री. क्षेत्र महाबळेश्‍वर
शिवाजी सर्कल (रविवार पेठ) रंगमहाल
बालगणेशोत्सव मंडळ (केसरकर पेठ) वाहतुकीची सुरक्षितता
राजकमल गजानन मंडळ (शनिवार पेठ) पन्हाळ्याचा रणसंग्राम

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)