रातराणी, बंद घर आणि त्या दोघी!

ह्या पडक्‍या घरात कोणी राहत असेल, असे वाटले नव्हते. सिनेगॉगवर असते, तसे चित्र होते घरावर. ब्रिटिशकालिन बांधकाम असावे. काच फुटलेल्या खिडकीतून एक सी एफ एल दिवा लोंबकळत असलेला भैरीला दिसला होता. बाल्कनी लाकडाची होती, दगडी बांधकामात. ती तुटलेली होती पूर्ण. भिंतीत जिथे खाचा पाडून ती बसवली होती, त्याची रचना बघत भैरी उभी होती कितीवेळ. अशी बसवली तर बाल्कनी भिंतीत, असा शोध मनात पूर्ण झाल्यावर ती निघून गेली. मग दिवस मावळला. ती परत आली. आता त्या फुटक्‍या खिडकीतला सी एफ एल चमकत असलेला दिसला. एका तरुण मुलीचा पंजाबी ड्रेस घरात टांगलेला दिसला. इथे खरोखर राहतेय म्हणजे कोणी.

मग सकाळी ते घर जातांना कसे दिसते, येतांना कसे दिसते अशी नोंद उगाच झाली मनात. आणखीन दिवस सरले. मनात व्यापून टाकणारे विषय कमी नव्हते. ते घर येण्या-जाण्याच्या रस्त्यावरचे, इतकीच नोंद डोक्‍यात उरली. त्या रस्त्यावरच्या इतर वास्तूंकडे लक्ष जाऊ लागले. मनातले काहूर जरा शांत झाले होते. इथे जाणे-येणे-जाणे-येणे अंगवळणी पडले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवीन जागेचे कौतुक मावळले होते. ह्या बाजूला येणे बंद व्हावे, असेही वाटत होते, तो दिवस जवळ येत चालला होता. ह्या बंद घरात कोणी राहते की नाही, ह्या मनातल्या प्रश्‍नाला उत्तर मिळाल्यावर तिथेच फुललेली रातराणी दिसली. रात्री तिचा दरवळ सकाळी जणू म्यूट होऊन जातो. सगळा आवाज म्यूट! रातराणी रात्री सगळा वचपा काढत असते सुगंधाने आणि वाऱ्याच्या मदतीने. ही रातराणी श्‍वासाला जाणवल्यावर भैरीला काहीतरी संदेश त्यात आहे, असे वाटले. तिने दोन काड्या उपटून घेतल्या. तिसऱ्या दिवशी आणखीन एक काढून घेतली. तिच्या बागेत परत रातराणी फुलायची शक्‍यता आहे आता. सकाळी बंद- पडक्‍या घरातली तरुण मुलगी दोरीवर कपडे वाळत घालत होती. तुटक्‍या बाल्कनीतून ओढणी खाली उडून आली, रातराणीला झाकून टाकत. तिथल्या उजाड, पडीक, वास्तवात तोच एक सुगंध तिचा तरुण सोबती असावा, सख्खा, खराखुरा.

भैरीने ओढणी काढून, तिची चुंबळ करून पहिल्या मजल्यावरच्या त्या तरुण मुलीला ‘कॅच’ असे म्हणत ती फेकली. तुटक्‍या बाल्कनीत किती पुढे येणार? ती ओढणी परत रातराणीवर पडली. आता मुलगी म्हणाली, माझी मैत्रीण आहे. तुम्ही फांदी नेली नां, ती रुजवा, जगवा, फुलवा असे वदवून घेतेय. म्हणून सारखी ओढणी धरून बसली आहे…जगवाल नां? म्हणा हो!. हो, जगवेन…कॅच… कॅच… तुम्ही ह्या घरात राहतात? रिस्की आहे नां… भैरी म्हणाली. रिस्क कशात नाही? ह्या रातराणीचं बरंय, ती हे घर कधी कोसळेल आपल्या अंगावर, ह्या भीतीत तरी जगत नाही. किंवा दिवसा माझं घर बघून सुन्न होते आणि रात्री तो शीण विसरायला वेड्यासारखी दरवळते. आज तरी ती खुश असेल. तिचा एक हिस्सा भक्कम जागी रुजायला चालला आहे. रुजायला की कसे माहीत नाही. पण इथून दुसरीकडे जातोय, हे नक्की, भैरीने दिलासा दिला.

तेच तर… मला इथून दुसरीकडे जायची सोय नाही. म्हणून तर मी जे आहे, तेच सुगंधी करतेय. भीतीत किती काळ राहू? दिवसा मी घरी नसते. रात्री ही माझ्या सोबत असते….दरवळलेली….

– प्राची पाठक 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)