घसरत्या रूपयाची तुलना मोदींच्या आईच्या वयाशी
इंदूर – कॉंग्रेसचे आणखी एक नेते आणि त्या पक्षाचे उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनीही वादग्रस्त वक्तव्य करून टीकेसाठी भाजपच्या हाती आयतेच कोलित दिले. बब्बर यांनी घसरत्या रूपयाची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या वयाशी केली. त्यामुळे त्यांनी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली.
अभिनेते असणाऱ्या बब्बर यांनी मध्यप्रदेशातील कॉंग्रेसच्या प्रचार सभेत बोलताना मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधान बनण्याआधी मोदी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या मुल्यात होणाऱ्या घसरणीची खिल्ली उडवायचे. रूपयाच्या मुल्याने तत्कालीन पंतप्रधानांच्या (मनमोहन सिंग) वयाची पातळी गाठल्याचे ते म्हणायचे.
आपल्या परंपरेत बसत नसले तरी; आता रूपयाच्या मुल्याने मोदींच्या पूज्य आईचे वय गाठल्याचे आम्ही बोलू इच्छितो, असे बब्बर म्हणाले. त्या वक्तव्यावरून भाजपने बब्बर यांच्यावर टीकास्त्र सोडले. राजकारणात कुणाच्या आईला ओढणे योग्य नाही. सुरूवातीपासून मोदींच्या आईविषयी कॉंग्रेसचा दृष्टीकोन अयोग्य राहिला आहे.
बब्बर यांच्या वक्तव्याबद्दल राहुल यांनी माफी मागावी आणि अशाप्रकारच्या वादग्रस्त वक्तव्ये मान्य आहेत का ते त्यांनी स्पष्ट करावे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिली. तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी बब्बर यांनी माफी मागण्याची मागणी केली. निवडणुका आणि जनतेचा पाठिंबा गमावत असल्याने कॉंग्रेस नेते नैराश्यातून अयोग्य वक्तव्ये करत आहेत, असे त्यांनी म्हटले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा