राज ठाकरे साधणार उत्तर भारतीयांशी संवाद 

मुंबईत 2 डिसेंबर रोजी संवाद सभा 

मुंबई: उत्तर प्रदेश आणि बिहारींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. उत्तर भारतीय मंचने येत्या 2 डिसेंबर रोजी कांदिवलीत संवाद सभेचे आयोजन केले आहे. या सभेला मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहण्याचे राज यांनी मान्य केले आहे. गैरसमज दूर व्हावेत आणि संवाद निर्माण व्हावा या हेतूने राज ठाकरे यांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आल्याचे समजते.

राज ठाकरे यांनी भूमिपुत्रांवरील अन्यायाच्या विरोधात परप्रांतीयांना विशेषत: उत्तर भारतीयांना लक्ष्य केले आहे. अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या असो की छटपूजा वा रिक्षा-टॅंक्‍सी चालवणारे मुजोर उत्तर भारतीय असोत राज यांनी उत्तर भारतीयांना नेहमीच जोरदार विरोध केला. रेल्वे भरतीच्या मुद्यावर मनसेने उत्तर भारतीयांना सळो की पळो करून सोडले होते. मात्र, 2014 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आलेले अपयश लक्षात घेता राज यांनी परप्रंतीयांबाबत सौम्य भूमिका घेण्याचे ठरवलेले दिसते.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरात उत्तर भारतीयांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. मतांच्या राजकारणातील उत्तर भारतीयांचे महत्त्व लक्षात घेऊन मनसेने आपला विरोध बाजूला ठेवून त्यांना जवळ करायला सुरूवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज ठाकरेंनी माफी मागावी 
उत्तर भारतीय समाजाशी संवाद साधण्यापूर्वी राज ठाकरे यांनी त्यांची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली आहे. मारहाण, हिनतेची वागणूक दिल्याप्रकरणी राज यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. माफी मागितल्यास उत्तर भारतीय लोक राज ठाकरे यांना नक्कीच माफ करतील, असेही निरूपम यांनी म्हटले आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)