राज्य सुब्रतो मुखर्जी फुटबॉल : पुण्याच्या सेंट व्हीन्सेंट हायस्कूलला तिसरे स्थान

मुंबईच्या डॉन बॉस्को हायस्कूल संघाला विजेतेपद

कोल्हापूरच्या महाराष्ट्र विद्यालय संघाला उपविजेतेपद

पुणे – चौदा वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीमध्ये मुंबईच्या डॉन बॉस्को हायस्कूल संघाने कोल्हापूरच्या महाराष्ट्र विद्यालय संघाला 1-0 पराभूत करताना राज्य सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. पुण्याच्या सेंट व्हीन्सेंट हायस्कूल संघाने औरंगाबादच्या मोइनुल उलुम हायस्कूल संघाला 4-0 असे पराभूत करताना तिसरे स्थान राखले.

शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे-बालेवाडी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने राज्य सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्‌घाटन श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा आयुक्त डॉ. विजय झाडे, मनपा उपायुक्त तुषार दौंडकर, मनपा सहआयुक्त किशोरी शिंदे, क्रीडा व युवक सेवाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, आंतरराष्ट्रीय फुटबॉल मार्गदर्शक जयदीप अंगीरवार, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान आदी उपस्थित होते.

14 वर्षांखालील गटाच्या अंतिम लढतीत मुंबईच्या डॉन बॉस्को हायस्कूल संघाने कोल्हापूरच्या महाराष्ट्र विद्यालय संघाला 1-0 असे पराभूत करताना स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मध्यंतरानंतर मुंबई संघाच्या स्वान वनाप्पाने 48 व्या मिनिटाला गोल करताना मुंबई संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. या एकमेव गोलने मुंबई संघाला विजेतेपद मिळवून दिले.

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या सेंट व्हीन्सेंट हायस्कूल संघाने औरंगाबादच्या मोइनुल उलुम हायस्कूल संघाला 4-0 असे पराभूत केले. पुण्याच्या फैझल शेखने दुसऱ्या तर, करण मडकेने 7व्या मिनिटाला गोल करताना संघाला मध्यंतरापूर्वीच 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर फ्रॅंकलिन नाझरेथने 3ऱ्या, तर वियान मुरगूडने 10 व्या मिनिटाला गोल करताना पुणे संघाला 4-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. या लढतीत औरंगाबाद संघाला एकाही गोल करता आला नाही.

संक्षिप्त निकाल :
उपांत्य फेरी (पहिली लढत) : मुंबई (डॉन बॉस्को हायस्कूल) विरुद्ध औरंगाबाद (मोइनुल उलुम हायस्कूल)
मुंबई : नहुष खामकर (4 मिनिट), केथ फर्नांडीस (9 मिनिट ), क्रिस्टन डिसूझा (16 मिनिट), हरीश (23 मिनिट), बोरिस फर्नांडीस (34 मिनिट), औरंगाबाद : गोल नाही.
अंतिम निकाल : मुंबई 5 – औरंगाबाद 0
—-
उपांत्य फेरी (दुसरी लढत) : कोल्हापूर (महाराष्ट्र विद्यालय) विरुद्ध पुणे (सेंट व्हीन्सेंट हायस्कूल)
कोल्हापूर : आदित्य रेंडळे (7 मिनिट), संकेत मेढे (16 मिनिट), पुणे : वियान मुरगूड (16 मिनिट)
अंतिम निकाल : कोल्हापूर 2 – पुणे 1

तिसऱ्या स्थानासाठीची लढत : पुणे (सेंट व्हीन्सेंट हायस्कूल) विरुद्ध औरंगाबाद (मोइनुल उलुम हायस्कूल)
पुणे : फैझल शेख ( 2 मिनिट), करण मडके (7 मिनिट), फ्रॅंकलिन नाझरेथ (3 मिनिट), वियान मुरगूडने (10 मिनिट), औरंगाबाद : गोल नाही
अंतिम निकाल : पुणे 04 – औरंगाबाद 0

अंतिम लढत : मुंबई (डॉन बॉस्को हायस्कूल) विरुद्ध कोल्हापूर (महाराष्ट्र विद्यालय)
मुंबई : स्वान वनप्पा (48 मिनिट), कोल्हापूर : गोल नाही
अंतिम निकाल : कोल्हापूर 0 – मुंबई 1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)