राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर लवकरच सातवा वेतन आयोग – दीपक केसरकर

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी लागू करण्याबाबत नेमलेल्या के.पी. बक्षी समितीचा अहवाल शासनास पाच डिसेंबरपर्यंत प्राप्त होणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्यात येईल व १ जानेवारी २०१९ पासून केंद्राच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, असे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य कपिल पाटील यांनी राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना श्री. केसरकर बोलत होते.

कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याबाबत नेमलेल्या खटुआ समितीचा अहवाल अद्याप शासनास प्राप्त झालेला नाही. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन स्तरावर याबाबत निर्णय घेण्यात येईल. केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे केसरकर पुढे म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री श्रीकांत देशपांडे, नागो गाणार यांनी सहभाग घेतला.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटी दूर करणार

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटी दूर करण्यात येतील. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचारी व अधिकारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. मात्र, परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना ही २७ ऑगस्ट २०१४ पासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे. निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या १० जानेवारी २०१८ च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतून अंशतः पैसे काढण्याची सुविधा अपवादात्मक परिस्थितीत उपलब्ध आहे. सभासदाच्या संपूर्ण सेवा कालावधीत तीन वेळा जमा रकमेच्या २५ टक्के मर्यादेत ( कर्मचाऱ्याच्या जमा अंशदान लाभासह) रक्कम काढण्याची तरतूद आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)