राज्य घटना बदलण्याची हिंमत कोणीही दाखवू नये

सुशीलकुमार शिंदे : डॉ. यशवंत मनोहर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार

पुणे – भारतीय राज्यघटना ही खंबीर, प्रखर व उत्तम विचारांनी बांधलेली आहे. या राज्यघटनेमुळेच भारत देश हा एकसंघ राहिला आहे. त्यामुळे ही राज्य घटना कधीच कोणालाही बदलणे शक्‍य होणार नाही. घटना बदलण्याची कोणी हिंमतही दाखवू नये, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे हे होते. यावेळी विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे पाटील, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष उध्दव कानडे, कार्याध्यक्ष सचिन इटकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाहिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी, पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, हडपसर येथील एस.एम.जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, कवयित्री कल्पना दुधाळ, खंडेराय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणपतराव बालवडकर आदींनाही सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.

राजकारणाला सभ्यपणा कळत नाही अन्‌ आता राजकारणात सुसंस्कृतपणा राहिलेलाही नाही, असे डॉ.यशवंत मनोहर यांनी स्पष्ट केले आहे. नारायण सुर्वे हे युगप्रवर्तक होते. ते सूर्यकुलांचे सभासद होते. त्यांच्याकडे साधेपणा असला तरी त्यांच्या कविता प्रभावशाली आहेत. त्यांनी अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचेच काम सतत केले आहे, असे विचारही ही यशंवत मनोहर यांनी मांडले आहेत.

आता माणसे जोडण्याचे काम कवी, साहित्यिक यांनाच करावे लागणार आहे. देशाबरोबरच जगातही शांतता कशी राहिला याचा विचार प्रत्येकाला करावाचा लागणार आहे, असे रामदास फुटाणे यांनी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन इटकर यांनी केले. सूत्रसंचालन उध्दव कानडे यांनी केले तर आभार संदिप सांगळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)