राज्य ग्रंथालय नियोजन समिती होणार पुनर्रचना

शासनाची मान्यता : 7 जणांचा समावेश

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव असणार अध्यक्ष

पुणे – राज्यात ग्रंथालय सेवा प्रभावीपणे राबविण्यासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत राज्य ग्रंथालय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या पुनर्रचनेस नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे.
केंद्र शासनाच्या आर्थिक सहाय्याने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली आहे. देशातील सार्वजनिक ग्रंथालय सेवेचा सार्वत्रिक विकास करणे हे या प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे. राज्यात व संघराज्यात ग्रंथालय सेवा प्रभावीपणे राबवून ती वाढविण्यासाठी प्रतिष्ठान राज्यांना अनुदान देत असते.

प्रतिष्ठानच्या योजना राबविण्यासाठी प्रतिष्ठानच्या “सर्वांसाठी पुस्तके’ या पुस्तकामधील मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्य ग्रंथालय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची मुदत 29 मार्च 2018 रोजीच संपली आहे. त्यामुळे नवीन समितीची पुनर्रचना करण्यास राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव द. रा. कहार यांनी आदेश काढले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या समितीत एकूण 7 जणांचा समावेश असणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव अध्यक्ष असणार आहेत. राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानचे संचालक तथा प्रतिनिधी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष किंवा कार्यवाह, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय विभागाचे उपसचिव यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासननियुक्त सदस्य म्हणून विनय मावळणकर यांची, तर निमंत्रक तथा सदस्य सचिव म्हणून राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक यांना समितीत स्थान देण्यात आले आहे.

ही समिती तीन वर्षांपुरतीच मर्यादीत राहणार आहे. ग्रंथालय संचालकांनी प्रतिष्ठानकडून राबविण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या समान निधी व इतर मदत योजनांसाठी मंजूर निधीचा प्रारुप आराखडा सादर करणे व त्यास अंतिम मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव नियमानुसार तपासून समितीस सादर करणे बंधनकारक राहणार आहे. समितीच्या अशासकीय सदस्यांचा प्रवासभत्ता व दैनिक भत्ता शासनाच्या निर्णयानुसार अदा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)