1 जूनपासून किसान सभेचा राज्यभर घेराव!
पालघर – शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी एक जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दुधाला किमान 27 रुपये भाव द्यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार, किसान सभा आणि लाख गंगा आंदोलकांनी सर्व दूध उत्पादक जिल्ह्यात तहसील कार्यालयांमध्ये खाटी जनावरे बांधून आणि सरकारच्या दगडी पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्याची हाक दिली आहे.

लाखगंगा येथे संपन्न झालेल्या ग्रामसभेत आमदार बच्चू कडू, डॉ. अजित नवले, धनंजय धोरडे यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकरी संप आणि ऐतिहासिक लॉंग मार्चला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी देणारा कायदा करा, या मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने एक जून रोजी राज्यभर तहसील कार्यालयांना घेराव घालत आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सरकारने या आंदोलनाची रास्त दखल घेत मागण्यांबाबत कारवाई न केल्यास समविचारी शेतकरी संघटनांना बरोबर घेत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे किसान सभेने जाहीर केले आहे. किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित, किसन गुजर आदींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने “लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणत मोफत दूध वाटपाचे आंदोलन करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालीही दूध प्रश्नावर आंदोलन झाले. बोंड अळी, जमिनीचे हक्क, पिक विमा या प्रश्नांवरही राज्यात सातत्याने आंदोलने झाली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आंदोलकांच्या मागण्या सातत्याने मान्य केल्या. मात्र या मान्य मागण्यांची अमलबजावणी करताना शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्यात आला. अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विश्वासघाताविरोधात समविचारी संघटनांना सोबत घेत पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

1 जून रोजी सरकारी कार्यालयांना घेराव घालत या आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे. समविचारी शेतकरी संघटनांबरोबर चर्चा करुन त्या नंतर लढ्याची पुढील दिशा निश्‍चित केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)