पुण्याचे तापमान 12 अंशांपर्यंत खाली
पुणे – राज्यात थंडीचा जोर कायम असून गुरुवारीही काही भागांत किमान तापमान बारा ते पंधरा अंश सेल्सिअस दरम्यान होते. पुण्यात ही तापमानाचा पारा 12 अंशांपर्यंत खाली आला आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान नगरमध्ये 10 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
राज्यातील हवामान कोरडे असल्यामुळे आणि उत्तरेकडून येणारे शीतवारे हे प्रभावी असल्याने राज्यात सध्या थंडीची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील किमान तापमानात घट झाली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. पुण्यातही दोन दिवसांपासून गारठा वाढला आहे. रात्रीच्यावेळी तापमानात कमालीची घट होत असल्याने थंडी जाणवत आहे. त्यामुळे स्वेटर, शाल खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. सकाळच्या वेळात सुद्धा थंडी असते. साधारण दहा ते अकरा वाजेपर्यंत थंडीचा जोर कायम राहात आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा