राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालये – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – राज्यात पिंपरी-चिंचवड, मीरा-भाईंदर आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
गृह विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने फडणवीस यांनी ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी शासनाकडे अहवाल आला आहे. मीरा-भाईंदरसाठीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून कोल्हापूर पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरात लवकर अहवाल मागविण्यात येईल.

या विषयावरील चर्चेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी तसेच पोलिसांच्या निवासस्थानासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना तालुक्‍याच्या ठिकाणी राहायचे असेल तर त्यासाठी शासनाने नवीन धोरण केले असून त्यानुसार पोलिसांना हक्काची घरे देण्यासाठी बॅंकेचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पोलिसांसाठी चांगल्या वसतिगृहाची सोय करण्यात येईल.

केसरकर म्हणाले की, राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची 92 हजार 156 पदे मंजूर असून त्यातील केवळ 5 हजार 979 पदे रिक्त आहेत. ती लवकरच भरण्यात येतील. पोलीस उपनिरीक्षकांची 750 पदे 2016 मध्ये भरण्यात आली असून यावर्षी 650 पदे भरण्यात येणार आहेत. राज्यात सीसीटीव्ही कॅमेरे, सीसीटीएनएस, सायबर प्रकल्प, ई-चलन, डायल 112 आदींसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी, यंत्रसामुग्री, साधनसामुग्री, वाहने यासाठी पुरेशी तरतूद करण्यात आहे. नक्षलविरोधी अभियानासाठी शस्त्रांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

पोलीस ठाण्यांच्या आधुनिकीकरणासाठी 114 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पोलीस निवासस्थानासाठी 375 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निर्भया योजनेसाठी 20 कोटी, नक्षल अभियानासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय न्यायवैद्यक प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, निवासी प्रशिक्षण केंद्र आदींसाठी तरतूद करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)