राज्यातील 48 हजार शाळा बनल्यात “प्रगत’

राज्य शासनाच्या विविध बाबींच्या तपासणीत उत्तम गुण प्राप्त

पुणे – राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत राज्यातील शाळांमधील सुविधा, विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण, विद्यार्थ्यांची गुणवत्ता या बाबींची तपासणी करण्यात आली आहे. यात उत्तम गुण प्राप्त करणाऱ्या 48 हजार शाळा या “प्रगत’ शाळा ठरल्या आहेत.

राज्याच्या विविध भागांत दिवसेंदिवस शाळांची संख्या वाढत चालली आहे. सध्या राज्यात 1 लाख 6 हजार 572 प्राथमिक शाळा व 26 हजार 879 माध्यमिक शाळा आहेत. शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी 2015-16 पासून राज्य शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केला आहे. एकही मूल शैक्षणिकदृष्ट्या अपेक्षेपेक्षा कमी असणार नाही यासाठी मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित शैक्षणिक क्षमता संपादीत केली आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याकरीता या कार्यक्रमांतर्गत विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांमधील मूलभूत क्षमता व शैक्षणिक पातळी ओळखण्यासाठी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण घेण्यात येत असते. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षातून तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्यात येतात. यात एक पायाभूत चाचणी व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामधील संकलित मूल्यमापनाच्या दोन चाचण्या आहेत. या चाचण्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात येतात. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी शासनाकडून शिक्षकांना आवश्‍यकतेनुसार व मागणीनुसार प्रशिक्षणही देण्यात येत आहे. राज्यातील शैक्षणिक सुविधांना उत्तेजन देण्यासाठी शासन कंपन्यांना त्यांचा खासगी सामाजिक दायित्व निधी शालेय प्रणालीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे.

विशेष पथकांमार्फत तपासणी
राज्य शासनाने प्रगत शाळांसाठी काही महत्त्वपूर्ण निकष ठरविले आहेत. विशेष पथकांमार्फत शाळांची तपासणीही करण्यात येत असते. यात प्रामुख्याने शाळेतील पटसंख्या, शाळांमध्ये उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, वाचन व लेखनातील प्रगती, मूल्यमापन चाचण्या, शिक्षकांनी स्वत: निर्माण केलेले शैक्षणिक साहित्य आदींची पाहणी करण्यात येत असते. वर्गवारीनुसार शाळांना गुण दिले जातात. गुणांमध्ये अग्रेसर असणाऱ्या शाळा या प्रगत शाळा ठरविल्या जातात. कमी गुण मिळविणाऱ्या शाळा या अप्रगत शाळा म्हणून ओळखल्या जातात.

प्रगत शाळांच्या संख्येत दरवर्षी वाढ
2015-16 मध्ये प्रगत शाळांची संख्या केवळ 8 हजार 791 एवढीच होती. त्यानंतर 2016-17 मध्ये ही संख्या 24 हजार 687 एवढी झाली. आता 2017 -18 मध्ये प्रगत शाळांची संख्या ही 47 हजार 973 पर्यंत पोहोचली आहे. प्रत्येकवर्षी प्रगत शाळांची संख्या ही वाढतच चालली आहे. राज्यातील सर्वच शाळा प्रगत झाल्या पाहिजेत यासाठी शाळांना सतत प्रोत्साहन देण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)