मुंबई : शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सन 2015-16 मध्ये राज्य शासनाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम’ 22 जून 2015 रोजी जाहीर केला. आता याच कार्यक्रमांतर्गत राज्यातील 45 हजारहून अधिक शाळा प्रगत, 61 हजारहून अधिक डिजिटल तर 3 हजारहून अधिक शाळा आयएसओ 9000 प्रमाणित शाळा झाल्या आहेत.
महाराष्ट्राचा शैक्षणिक वारसा कायम पुढे राहावा, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील शैक्षणिक सुविधा जागतिक दर्जाच्या व्हाव्यात, यासाठी राज्याच्या शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम म्हणजे शिक्षणाच्या नवीन क्रांतीची सुरुवात आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामुळे राज्यातील 45 हजार 676 शाळा प्रगत, 61 हजार 247 शाळा डिजिटल तर 3 हजार 325 आयएसओ 9000 प्रमाणित शाळा झाल्या आहेत.
प्रत्येक मूल शिकले पाहिजे, या हेतूने शिक्षण संचालनालयामार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येत आहे. वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या शिक्षणासाठीच्या मूलभूत क्षमता आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला त्या वेळीच प्राप्त व्हाव्यात, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का व्हावा हाच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा