राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांमध्ये दिवसेंदिवस वाढ

राज्यातील शासकीय शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची 20 हजार 412 पदे अद्याप रिक्तच

पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शासकीय शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या शासकीय शाळांमध्ये 20 हजार 412 प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असून त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये 16 हजार 585 शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे.

राज्यात शासकीय व खासगी शाळांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच 2012 पासून शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातली आहे. यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांमध्येही वाढ झाली आहे. नगर जिल्ह्यातील विपूल गागरे यांनी माहिती अधिकाराद्वारे राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे मागितली होती. त्यांना ती माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतसह कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये 2 लाख 24 हजार 133 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यातील सध्या 2 लाख 7 हजार 548 पदे कार्यरत आहेत. उर्वरित 16 हजार 585 पदे अद्याप रिक्त आहेत. महापालिकांच्या शाळांमध्ये 21 हजार 286 पदे मंजूर असून त्यातील 18 हजार 259 पदे भरण्यात आली आहेत. या शाळांमधील 3 हजार 27 पदे अजूनही रिक्तच आहेत. महापालिकेच्या स्वयंअर्थसहायित शाळेत 49 पदे मंजूर असून यातील 38 पदे भरली आहेत. आता 11 पदे रिक्त आहेत. नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतींच्या शाळांमध्ये 6 हजार 345 पदे मंजूर असून यातील 5 हजार 588 पदे भरण्यात आली आहेत. या शाळांमधील 757 पदे अजूनही रिक्त आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांमध्ये 156 पदे मंजूर असून यातील 124 पदे कार्यरत आहेत. या शाळांमधील 32 पदे रिक्त आहेत.

जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे
राज्यात एकूण 20 हजार 412 एवढी प्राथमिक शिक्षकांची पदे सध्या रिक्त आहेत. यात सर्वांत जास्त रिक्त पदे ही जिल्हा परिषदांच्या शाळामधील आहेत. या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये 16 हजार 585 पदे रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध असलेल्या शिक्षकांवरच कामाचा अतिरिक्त ताण पडू लागला आहे. कामाच्या अतिरिक्त भारामुळे अनेकदा या शिक्षकांकडून तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात येते. त्यातच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या सतत बदल्या होत असतात. या बदल्यांमुळेही काही शिक्षकांमध्ये आनंदाचे तर काही शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण दरवर्षीच पसरत असते. प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे त्त्वरीत भरावीत, अशी मागणीही विविध शिक्षक संघटनांकडून राज्य शासनाकडे वारंवार करण्यात आली आहे. मात्र, शासनाकडून अद्याप त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही.

नोंदणीसाठी पुरेसा प्रतिसाद नाही
राज्य शासनाने पारदर्शकपणे शिक्षकभरती करण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षात पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. खासगी व शासकीय शिक्षण संस्थांनाही पोर्टलवर बिंदू नामावलीची नोंदणी करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही या शैक्षणिक संस्थांकडून नोंदणीसाठी पुरेसा प्रतिसाद अद्यापपर्यंत मिळालेला आढळत नाही. यामुळे शिक्षक भरती ही आणखी लांबणीवरच पडण्याची जास्त शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)