राज्यातील मंत्रीच गुंडांना पोसतात!

File Photo

राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट
मुंबई – राज्यातील मंत्रीच गुंडांना पोसत असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज विधानसभेत केला. एका मंत्र्याच्या शहरात “मंडी टोळी’ नावाची एक कुख्यात टोळी असून या टोळीकडे किमान 4 हजार शस्त्रे आहेत. जागा-घरे खाली करणे, खंडणी वसुली करणे, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग ही टोळी करीत असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला.

विधानसभेत नियम 293 अंतर्गत विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढले. एका मंत्र्याच्या शहरात “मंडी टोळी’ नावाची एक कुख्यात टोळी कार्यरत असून या सरकारच्या “कौशल्य विकास योजने’त शाम जयस्वाल आणि बंटी जयस्वाल यांच्या मंडी टोळीचे गुन्हेगारी कौशल्य प्रचंड विकसित झाले आहे. आज त्या शहरात इतकी प्रचंड दहशत निर्माण झाली आहे की, त्यांच्याविरूद्ध ब्र उच्चारण्याचीही कोणाची ताकद राहिलेली नाही. या टोळीला राज्यातील एका मंत्र्याचाच खुला पाठिंबा आहे की नाही, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी गुप्तचर विभागाकडून खातरजमा करून घ्यावी, असे म्हणाले.

मुंबई शहरालगत राहणाऱ्या एका मंत्र्यांच्या चेल्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हैदोस घातला आहे. कारखान्यांवर बनावट धाडी घातल्या जात आहेत. त्यांच्याकडून खंडणी वसुली होते आहे. नगरसेवकांच्या खुनाच्या सुपाऱ्याही दिल्या जात आहेत. राज्यातील मंत्रीच गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत, गुन्हेगारी टोळ्यांना पाठीशी घालत आहेत. तरीही मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष का करतात, अशी विचारणा विखे पाटील यांनी यावेळी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)