राज्यातील भारनियमन अखेर आटोक्‍यात

वीजपुरवठा करणाऱ्या स्रोतांकडून मागणीएवढी वीज

पुणे – महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांकडून मागणी एवढी वीज उपलब्ध होत असल्याने 7 मे पासून राज्यामध्ये कुठेही भारनियमन करावे लागत नाही. उद्या (शनिवारी)पासून कृषीपंपधारकांना सुध्दा पूर्ववत रात्री 10 तास किंवा दिवसा 8 तास चक्राकार पध्दतीने 3 फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

विजेची उपलब्धता आणि मागणी याचा ताळमेळ घालण्यासाठी महावितरणने मे महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस वितरण व वाणिज्यिक हानी जास्त असलेल्या म्हणजे जी-3, जी-2, जी-1 एफ आणि ई अशा गटामध्ये गरजेनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत भारनियमन केले होते. यातही अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे कमी वितरण व वाणिज्यिक हानी असलेल्या गटांच्या वाहिन्यांवर तसेच कृषी वाहिन्यांवर मर्यादित काळाकरिता भारनियमन करावे लागल होते. तसेच दि. 5 मे पासून कृषिपंपांच्या वेळेमध्ये व उपलब्धतेमध्ये बदल करून 8 तास वीजपुरवठा करण्यात येत होता.

वीज उपलब्धतेत वाढ करण्यासाठी राज्याचे उर्जामंत्री यांनी केंद्र सरकारला विनंती करून कोळशाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करून घेतली आहे. तसेच महावितरणने करार केलेले सर्व वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत, द्विपक्षीय कराराद्वारे 500 मे.वॅ. वीज उपलब्ध करून घाटघर विद्युत निर्मिती केंद्राचा प्रभावी वापर आणि आवश्‍यक त्या काही तासांसाठी पॉवर एक्‍सचेंजमधून 300 ते 1,800 मे.वॅ. पर्यन्त वीज खरेदी करून विजेची तूट भरून काढली आहे. माहे एप्रिल व मे 2017 या महिन्यात कमाल मागणी 19 हजार ते 19 हजार 600 मे.वॅ. एवढी नोंदविली गेली होती.

वरील उपाययोजनेमुळे 7 मे पासून राज्यामध्ये कुठेही भारनियमन करावे लागले नाही. त्यामुळे शनिवारपासून रात्री बारानंतर कृषिपंपांनासुध्दा पूर्ववत रात्री 10 तास किंवा दिवसा 8 तास चक्राकार पध्दतीने 3 फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)