राज्यातील धार्मिक संस्थानकडे कोट्यवधींचा पैसा पडून

जेजुरी- राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालये लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील कार्यालयात झिरो पेंडन्सी झाली असल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालय गोरगरिबांची मदत केंद्रे व्हावीत, असा प्रयत्न सुरू आहे. या उद्देशाने सर्वसामान्य आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांना वैद्यकीय मंदत देण्याच्या उपक्रमाला गती देण्यात येत आहे. राज्यातील धार्मिक संस्थानकडे कोट्यवधींचा पैसा पडून आहे तर दुसरीकडे कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. धार्मिक संस्थानकडे असलेल्या पैशातून देवांना दागिने करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाकरिता तसेच सामुदायिक विवाह सोहळ्या सारख्या उपक्रमाकरिता सामाजिक व धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डीगे यांनी केले.
राज्यातील गोरगरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी सामुदायिक विवाह संकल्पनेची चळवळ उभी राहावी याबाबत धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्था, न्यासांच्या वतीने सोमवारी (दि.26) अल्पबचत भवन पुणे सभागृहात जिल्ह्यातील सामाजिक, धार्मिक संस्था न्यासांच्या पदाधिकारी व विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य धर्मादाय आयुक्त डिगे मार्गदर्शन करीत होते. यावेळी पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजीराव कचरे, सहाययक आयुक्त शेखर गोडसे, एस.एम.एस.आय.रचभरे, आय.के.सूर्यवंशी, उपायुक्त नवनाथ जगताप, निरीक्षक कैलास महाले तसेच जिल्ह्यातील विविध धार्मिक सामाजिक संस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवकुमार डीगे म्हणाले की, धार्मिक संस्थेवर काम करीत असलेल्या विश्वस्तांनी समाजातील जाणिवांची दखल घ्यावी, विश्वस्त हे काही मिरवण्यासाठीचे पद नाही. गोरगरिबांचे सुख-दुःख समजून घेत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे, ग्रामीण भागात कर्ज काढून मुलीचा विवाह करण्याचे प्रमाण मोठे आहे, हेच कर्ज पुढे फेडले गेले नाही तर आत्महत्येसारख्या दुर्देवी घटना घडतात. लोकांच्या जिवापेक्षा पैसा मोठा नाही, धार्मिक न्यासाकडे असलेला व दानधर्मातून आलेल्या पैशातून गोरगरिबांचा संसार उभा राहत असेल तर त्यासारखे पुण्य नाही. या संकल्पनेसाठी जिल्ह्याचे स्तरावर कमिटी केली जाईल, त्यांच्या माध्यमातुन समाजाच्या सर्वस्तरातील जाती धर्मातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी कामगारांच्या मुलामुलींची लग्ने रिती-रिवाजानुसार एकाच मंडपात लावली जातील.
सामुदायिक विवाह सोहळा या संकल्पनेला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालये नियोजन करीत असल्याचे उपायुक्त नवनाथ जगताप यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी डॉ. सुधाकर जाधवर, कैलास शेलार, शिवराज कदम, युवराज घाडगे, शिरीष मोहिते, वासुदेव शर्मा आदींसह लिंगायत सेवा मंडळ, ग्रामदैवत कसबा गणपती ट्रस्ट, श्रीमती दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी, थेऊर, सोमेश्वर आदी ठिकाणच्या संस्थांनी मनोगत व्यक्त करीत संकल्पना राबविणार असल्याचे जाहीर केले.

  • जेजुरी देवसंस्थान विवाह सोहळ्यासाठी स्वतंत्र कोष
    यावेळी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी श्री मार्तंड देवसंस्थान स्वतंत्रपणे कोष निर्माण करणार असून गडकोट आवारात सोहळ्यासाठी दानपेटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. या पेटीतील भाविकांनी दान केलेली रक्कम व लोकसहभागातून हा उपक्रम राबविणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे, पंकज निकुडे पाटील, शिवराज झगडे, तुषार सहाणे, संदीप जगताप आदी उपस्थित होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)