राज्याचे शिक्षक पुरस्कार जाहीर

108 शिक्षकांना पुरस्कार: जिल्ह्यातील सात शिक्षकांचा समावेश
पुणे – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या वर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा केली असून राज्यातील 108 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 7 शिक्षकांचा समावेश आहे. हे पुरस्कार शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी देण्यात येणार आहेत.
शैक्षणिक वर्ष 2017-18 या वर्षात आदर्श शिक्षकांच्या या यादीमध्ये 38 शिक्षक हे प्राथमिक शिक्षक आहेत, 39 माध्यमिक, 18 आदिवासी क्षेत्रात काम करणारे प्राथमिक शिक्षक, 8 सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, 2 कला व क्रिडा शिक्षक, 1 अपंग शिक्षक, 1 गाईड शिक्षक, 1 स्काउट शिक्षक असे एकूण 108 शिक्षक आहेत. राज्य शिक्षक पुरस्कार 1962-63 सालापासून देण्यात येत असून राज्य शिक्षकांना पुरस्कार म्हणून दहा हजार रुपये रक्‍कम दिली जाते. तर राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना 4 सप्टेंबर 2014 च्या शासन निर्णयानुसार 1 लक्ष रुपये ही ठोक रक्‍कमही दिली जाते.
राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील रायवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक माधुरी वेल्हाळ व दौंड येथील खेडेकर वस्ती येथील शिक्षक बळीराम सरपणे यांचा समावेश आहे. माध्यमिक शिक्षकांमध्ये शुक्रवार पेठेतील जिजामाता हायस्कूलमधील अण्णासाहेब पाटील तसेच पिंपरी येथील हिंदुस्तान अँटीबायोटिक्‍स स्कूलचे एकनाथ बुरसे हे शिक्षक यांचा समावेश आहे. आदिवासी भागात शिकवणाऱ्या शिक्षकांमध्ये जुन्नरमधील उत्तम सदाकाळ यांचा समावेश आहे. तर कला शिक्षकाचा पुरस्कार आहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलमधील मोहन देशमुख यांना देण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिकांमध्ये साधना विद्यालयाच्या डॉ.तेजस्विनी जगताप यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)