राज्याचे जलसंपदामंत्री माजी सहकारमंत्र्यापुढे आवाक्‌ 

शेटफळ तलावाच्या प्रश्‍नांवरील विशेष बैठकीत प्रश्‍न आणि उपायांवरही केली चर्चा
रेडा: इंदापूर तालुक्‍यातील जलस्त्रोतांसह पाऊसपाणी आणि उपलब्ध पाणी तसेच शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना, त्याचे वेळापत्रक यासह शेटफळ तलावाच्या स्थितीबाबत प्रश्‍न आणि त्यावरील उपायही माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे तोंडपाठ असल्याप्रमाणे खडाखडा सांगितल्यानंतर जलसंपदामंत्री अवाक्‌ झाले.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मुंडे हे यासंदर्भात अभ्यास करतील, त्यानंतर निर्णय घेवू तसेच कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही महाजन यांनी पाटील यांना आश्‍वासन दिले.
शेटफळ तलावाच्या पाण्यावर लाभक्षेत्रातील बावडा, भोडणी, वकिलवस्ती, सराटी, निरनिमगाव, कचरवाडी, शेटफळ, पिठेवाडी, लाखेवाडी या नऊ गावांमधील शेती व सुमारे 13 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. या तलावातून उपसा सिंचन परवानगीसाठी आलेल्या 115 अर्जदारांना परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
या प्रश्‍नावर मुंबई येथे आज झालेल्या विशेष बैठकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह शिष्टमंडळाने मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सदर मागणी केली. पाटील यांनी मंत्री गिरिश महाजन यांना यासंदर्भात सविस्तर माहीती दिली. शेटफळ प्रकल्पातून 115 अर्जदारांना उपसा सिंचनासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असा पाणी तक्रार अर्ज बावडा येथील अजित टिळेकर व निरनिमगाव येथील दत्तात्रय घोगरे यांनी लवादाकडे दाखल केला होता. यावर दोन महिन्यांपूर्वी निकाल देताना उपसा सिंचनास परवानग्या देणे, ही बाब धोरणात्मक स्वरूपाची असल्याने अर्जांवर शासनस्तरावर निर्णय घेण्यात यावा, असा आदेश वि.गि.रजपूत, प्राथमिक विवाद निवारण अधिकारी यांनी दिला.
नीरा डावा कालव्यामार्फत केवळ वीर धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर व निरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सिंचनाची गरज पुर्ण झाल्यानंतर शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्यात येते. हा तलाव ब्रिटिशकालीन असून पाणी साठवण क्षमता 620 दलघफूट एवढी आहे. या उपलब्ध पाण्यात मूळ लाभक्षेत्रातील शेतक-यांची गरज भागू शकते. उपसा सिंचनासाठी अर्ज केलेल्या 115 अर्जदारापैंकी 111 अर्जदार हे निरा डावा कालवा अथवा शेटफळ प्रकल्पाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील आहेत. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना उपसा पाणी परवाने देणे प्रचलित नाही, असे मुद्दे यावेळी माजी सहकारमंत्री पाटील यांनी जलसंपदा मंत्री महाजन यांच्या समोर मांडले.
यावेळी उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, दत्तात्रय घोगरे, अजित टिळेकर, मनोज पाटील, पंडीतराव पाटील, महादेव घाडगे, अमर पाटील, प्रतापराव पाटील, विष्णू वाघमोडे, सतीश अनपट, अनिल चव्हाण, संतोष जगताप, हनुमंत चव्हाण, महादेव शेंडगे हे उपस्थित होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)