राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धा : 19 वर्षांखालील मुलींच्या गटांत मुंबई उपनगर विजेते

पुणे शहर मुलांच्या संघाला विजेतेपदाचा मान; पुणे जिल्हा मिनी फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजन

पुणे: पुणे शहर संघाने 17 वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावताना राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेतील अखेरचा दिवस गाजविला. पुणे जिल्हा मिनी फुटबॉल संघटनेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलांच्या अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत पुणे शहर संघाने सातारा संघावर 1-0ने मात केली. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. लढतीच्या दहाव्या मिनिटाला साहिल कदमने गोल करून पुणे शहर संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर सातारा संघाने बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, त्यात सातारा संघाला यश आले नाही आणि 1-0 अशी आघाडी शेवटपर्यंत कायम राखून पुणे शहर संघाने जेतेपद मिळवले.

मुलींच्या गटात मुंबई उपनगर विजयी

स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलींच्या गटात मुंबई उपनगर संघाने बाजी मारली. अंतिम लढतीत मुंबई उपनगर संघाने पुणे शहर संघावर 1-0ने मात करून विजेतेपद मिळवले. मुंबई उपनगरकडून एकमेव गोल राखी सावंतने पाचव्या मिनिटाला केला. स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या गटात लातूर शहर संघाने विजेतेपद मिळवले. लातूर शहर संघाने टायब्रेकरपर्यंत खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत कोल्हापूर संघावर 2-1ने मात केली.

निर्धारित वेळेत लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. यात कोल्हापूरकडून फरहान मकानदार (सहावे मि.) याने, तर लातूरकडून समीर चाटे (सातवे मि.) याने गोल करताना सामना निर्धारित वेळेत टाय केला. यानंतर टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात ओंकार पाटीलने करून लातूर शहरला विजेतेपद मिळवून दिले.

पुणे जिल्ह्याला उपविजेतेपद

स्पर्धेतील 12 वर्षांखालील मुलांच्या गटात पालघर संघाने विजेतेपद मिळवले. पालघर संघाने रंगतदार अंतिम लढतीत पुणे जिल्हा संघावर 1-0ने निसटती मात केली. लढतीच्या तिसऱ्याच मिनिटाला ओंकार देशपांडेने गोल करून पालघर संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर पुणे जिल्हा संघाला शेवटपर्यंत बरोबरी साधता आली नाही. त्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सविस्तर निकाल-
17 वर्षांखालील मुले- अंतिम फेरी- पुणे शहर संघ 1 (साहिल कदम दहावे मिनिट) वि.वि. सातारा संघ 0,
19 वर्षांखालील मुलीं- अंतिम फेरी- मुंबई उपनगर संघ 1 (राखी सावंत पाचवे मिनिट) वि.वि. पुणे शहर संघ 0,
14 वर्षांखालील मुले- अंतिम फेरी- लातूर शहर संघ 2 (निर्धारित वेळेत समीर चाटे सातवे मि. टायब्रेकरमध्ये ओंकार पाटील) वि.वि. कोल्हापूर संघ 1 (निर्धारित वेळेत फरहान मकानदार सहावे मिनिट),
12 वर्षांखालील मुले- अंतिम फेरी- पालघर संघ 1 (ओंकार देशपांडे तिसरे मिनिट) वि.वि. पुणे जिल्हा संघ 0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)