राज्यसभेतील भाजपचे संख्याबळ 69, कॉंग्रेसचे 50

मात्र, सत्तारूढ एनडीए बहुमतापासून दूरच
नवी दिल्ली – नुकतीच झालेली राज्यसभा निवडणूक भाजपसाठी मोठी फलदायी ठरली आहे. या निवडणुकीमुळे भाजपच्या पदरी अतिरिक्त 11 जागा पडल्या. त्यातून त्या पक्षाचे राज्यसभेतील संख्याबळ 58 वरून 69 वर पोहचले आहे.

राज्यसभेचे एकूण संख्याबळ 245 इतके आहे. सभागृहातील रिक्त झालेल्या किंवा लवकरच रिक्त होणाऱ्या 59 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यातील 28 जागा भाजपला मिळाल्या. कार्यकाळ संपलेल्या किंवा समाप्त होत असलेल्या 17 सदस्यांच्या बदल्यात भाजपला अधिक 11 सदस्य मिळाले. तर कॉंग्रेसला निवृत्त होणाऱ्या 14 सदस्यांच्या बदल्यात 10 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ घटून 54 वरून 50 इतके झाले आहे. भाजपचे संख्याबळ वाढूनही राज्यसभेत त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीला (एनडीए) बहुमतापासून दूरच रहावे लागणार आहे.

याशिवाय, राज्यसभेत 6 सदस्य असणारा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) काही दिवसांपूर्वीच एनडीएमधून बाहेर पडला आहे.
मात्र, राज्यसभेत जोरदारपणे विरोधी सूर आळवणाऱ्या कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाचे (सप) घटलेले संख्याबळ एनडीएला दिलासा देणारे आहे. सपचे 6 सदस्य लवकरच निवृत्त होणार आहे. मात्र, त्या पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. लोकसभेत मजबूत बहुमताची शिदोरी पाठिशी असणाऱ्या मोदी सरकारला राज्यसभेत बहुमताअभावी बऱ्याचदा हतबल व्हावे लागते. लोकसभेत एखादे विधेयक मंजूर झाले तरी ते राज्यसभेत एकवटलेले विरोधक रोखून धरतात.

मात्र, आता विरोधकांचा दबाव काहीसा कमी होणार आहे. याशिवाय, एनडीएबाहेर असणारे अण्णाद्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर कॉंग्रेस आणि बिजदसारखे पक्ष बऱ्याचदा राज्यसभेत मोदी सरकारच्या मदतीला धावून येतात. या बाबी ध्यानात घेता आता राज्यसभेत सरकारचे पारडे काही प्रमाणात जड ठरण्याची चिन्हे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)