राज्यशासनाचा निर्णय चुकला?

सतीश कुलकर्णी यांचे निलंबन 


महापौर पाठविणार मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे – बदलीनंतरही महापालिकेतील पदभार सोडून जाण्यास दिरंगाई करणाऱ्या उपायुक्त सतीश कुलकर्णी यांना शासनाने निलंबित केले आहे. कुलकर्णी यांना महापालिकेच्या कामकाजासाठीच थांबविण्यात आले होते. त्यामुळे हा निर्णय चुकीचा असून त्याचे निलंबन मागे घेण्यासाठी राज्यशासनास पत्र पाठविले जाणार आहे. त्यासाठी चक्क शासनाच्या निर्णयाविरोधात महापौर आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले पक्षनेत्याशी चर्चा करून पत्र पाठविण्याचा निर्णय मुख्यसभेत घेण्यात आला.

महापालिकेत 2015 मध्ये कुलकर्णी प्रतिनियुक्तीने उपायुक्तपदी रुजू झाले होते. महापालिकेतील त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने कुलकर्णी यांची 12 फेब्रुवारीला बदली करण्यात आली. तसेच कुलकर्णी यांना कार्यमुक्त करत असल्याचे आदेश राज्यशासनानेच काढले होते. तसेच 14 फेब्रुवारीला तत्काळ हजर राहण्याचे आदेशही कुलकर्णी यांना देण्यात आले होते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढण्याची आवश्‍यकता नव्हती. असे असतानाही, तब्बल महिनाभर कुलकर्णी बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. त्यामुळे शासनाकडून पुन्हा 12 मार्च रोजी आयुक्तांना पत्र पाठवून त्याच दिवशी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत हजर राहण्याच्या सूचना केल्या.

मात्र, त्यानंतरही कुलकर्णी हजर झाले नाहीत. शासनाच्या पत्रात 12 मार्चला हजर न झाल्यास गैरहजरी ही अनुपस्थिती समजून कालावधी सेवाखंड समजण्यात येईल, तसेच शासन आदेशाचे उल्लंघन केले म्हणून शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही पत्रात देण्यात आला होता.

त्यानंतरही कुलकर्णी मुंबईत रुजू न झाल्याने त्याच दिवशी त्यांना निलंबित करण्यात आले होते. या बाबतचा प्रश्‍न बुधवारी मुख्यसभेत नगरसेवक सुभाष जगताप यांनी उपस्थित केला. सतीश कुलकर्णी यांची बदली झाली आहे का? त्यांचा पदभार कोणाकडे आहे अशी विचारणा केली. त्यानंतर विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी सतीश कुलकर्णी यांचे शासनाने निलंबन केले आहे का, अशी विचारणा केली. मात्र, प्रशासनाकडून त्याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यानंतर माजी उपमहापौर तसेच कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनीही याबाबत प्रश्‍न उपस्थित करत प्रशासन माहिती दडवित असल्याचा आरोप केला. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाचा खुलासा केला.

आयुक्‍तांचा खुलासा; विरोधक आक्रमक
आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, सतीश कुलकर्णी यांची राज्यशासनाने 12 फेब्रुवारीला बदली केली होती. मात्र, त्यांच्याकडे चांदणी चौक तसेच शिवसृष्टीच्या भूसंपादनाची जबाबदारी असल्याने त्यांना महापालिकेत मुदतवाढ द्यावी, असे पत्र शासनास पाठविण्यात आले होते. मात्र, शासनाकडून त्यावर निर्णय न घेता त्यांचे निलंबन करण्यात आले. यावेळी शासन चुकीचा निर्णय घेत असल्याची टीका विरोधकांनी केली. त्याला प्रतिसाद देत, सभागृह नेते आणि भिमाले यांनीही विरोधकांच्या सुरात-सूर मिसळत राज्यातील सत्ताधारी शासनाचा बदलीचा निर्णय चुकीचा असल्याची री ओढत सर्व पक्षीयांत सूर मिसळला. तसेच सर्वांच्या स्वाक्षरीने कुलकर्णी यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, असे पत्र पाठविण्याचा निर्णय मुख्यसभेत घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)