राज्यभर कडकडीत बंद, आंदोलकांकडून वाहतुक खंडीत

संग्रहित छायाचित्र

बंदमधून वगळूनही नवी मुंबई बंद


नाशिक, बुलढाणा, लातूरमध्ये वाहतुक रोखली

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद दरम्यान आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी वाहतुक रोखून धरली. मराठा समाजाच्या नेत्यांनी बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केलेले असतानाही रस्ते आणि लोहमार्ग वाहतुक रोखून धरण्यात आली. वाहतुक अडवण्यासाठी आंदोलकांनी काही ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे दोन गटांमध्ये मारामारी झाली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील गटाने या घोषणांना आक्षेप घेतला त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये एक जण जखमी झाला. मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून दोन्ही गटांतील आंदोलकांना पांगवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय लातूर, जालना, सोलापूर आणि बुलढाणामध्ये आंदोलकांनी बस आणि अन्य वाहनांची वाहतुक रोखली. आंदोलकांनी माढा शेटफळ रस्त्यावरील बस वाहतुक रोखली. हा मार्ग सोलापूर जिल्हातील पुणे- हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ला जोडला जातो. त्यामुळे तेथे मोठी वाहतुक कोंडी झाली. काही आंदोलकांनी जालना आणि अहमदनगर जिल्हात रस्त्यांवर पेटते टायर टाकले होते, असे पोलिसांनी सांगितले.

कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार प्रकाश अबितकर यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत विधान भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे अबितकर यांनी निषेधासाठी विधान भवनाबाहेरच ठिय्या आंदोलन केले.

नवी मुंबईमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या मोठ्या हिंसक घटनांच्या पार्श्‍वभुमीवर मराठा समाजाच्या विविध गटांची समन्वयक असलेल्या सकल मराठा समाज या संघटनेने आजच्या बंदमधून नवी मुंबईला वगळले होते. आज सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शांततेने बंद पाळला जाईल, असे संघटनेचे नेते अमोल जाधवराव यांनी काल सांगितले होते. मात्र अन्य गटांनी मुंबईतील उपनगरांमधील जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर ठिय्या आंदोलनाचे आवाहन केले होते.
हिंसक घटनांची शक्‍यता लक्षात घेऊन प्रशासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

नवी मुंबईला जरी वगळले असले तरी तुर्भे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवली गेली होती. नवी मुंबईमध्ये शीघ्र कृती दल आणि राखीव पोलिस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. सार्वजनिक बससेवा आणि उपनगरी रेल्वे सुरळीत सुरू होत्या. मुंबई- पुणे एक्‍सप्रेस्स वे आणि मुंबई- गोवा महामार्गावर कळंबोली येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदमुळे मुंबईसह राज्यातील काही भागांचा भाजीपाला पुरवठा विस्कळीत झाला. मुंबईतील दादर येथील भाजी बाजार जबरदस्तीने बंद करण्यात आला. मुंबईत घाटकोपर आणि ठाण्यात मूकमोर्चे काढण्यात आले. साताऱ्यात सर्व पेट्रोल पंप आणि भाजी बाजार बंद ठेवले गेले. एसटी वाहतुकही पूर्ण बंद होती. लातूरमध्ये मध्यरात्रीपासूनच रस्ते वाहतुक रोखली गेली. नाशिक, बुलढाणा, सोलापूर येथेही रस्ते वाहतुक रोखली गेली.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही बंद
मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये कायद्याच्या आधारे टिकून राहू शकेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार उपाय योजना करत आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

आरक्षणासाठीच्या तरतूदीसाठी नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी लागणार असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाच्या मुद्दयावर काहीही केले जाऊ शकणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितले होते. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत आजचा बंद पुकारण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)