राज्यभरात मुसळधार पाऊस:अनेक नद्यांना पूर

पुणे – राज्यात गेले चोवीस तासापासून सगळीकडे मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसामुळे अनेक नद्यांना पुर आले आहेत. विदर्भ,मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र काही भागातच पावसाचा जोर आहे. मराठवाड्यात तर गेल्या चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे परिसरातील अनेक लहान मोठे प्रकल्प भरले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे.

गेले तीन ते चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे पण कालपासून त्याचा जोर वाढला आहे. विशेष करुन उत्तर महाराष्ट्र कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची संततधार सुरु आहे. विशेष करुन मराठवाड्यातील पिकांना जिवदान मिळाले आहे. पावसाची ही संततधार अजून दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे.

मराठवाडा

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात गेले 4 दिवस पाऊस सुरु आहे. बीड, लातूर उस्मानाबाद जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आहे. सर्व लहान आणि मध्य प्रकल्प पाण्याने भरले आहेत. बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. जिल्ह्यातल्या बिंदुसरा, तलवार या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहे. नद्यांचं पाणी गावात शिरल्यानं अनेकांना स्थलांतर करावं लागलं आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मांजरसुंबा, पाली, कोळगाव, कपिलधार या भागात मुसळधार पाऊस झाल्यानं नदीला पूर आला आहे. काल आष्टी तालुक्‍यातील देवळाली पानांची गावात पूराचं पाणी शिरलं आहे. यामुळे गावातल्या अनेकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. पूरामुळे हजारो हेक्‍टर शेती पाण्याखाली गेली आहे. डोकेवाडा साठवण तलाव ओव्हरफलो झाला आहे. बिंदुसरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे.

उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये गोदावरीलाही पुन्हा पूर आला आहे. रामकुंडांसह गोदाकाठ पाण्याखाली गेला असून प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी, दारणा, वालदेवी, नासर्डी आदी नद्यांनाही पुर आला आहे. पालघर येथील धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे धरणातून जवळपास 14 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात येत आहे. यामुळे सूर्या नदीला पूर आला आहे.

कोकण

कोकणालाही पावसाने झोडपलं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सलग चार दिवस पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी सुरु झालेला पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही आहे. त्यामुळे गणेशभक्त चलबिचल असल्याचं पाहायला मिळतं आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 389.80 मिमी पाऊस पडला आहे. गणेशोत्सव म्हटला की, बाहेरगावी असलेला कोकणातील प्रत्येक चाकरमानी हमखास गावी येतोच. त्या निमित्तानं नातेवाईकांकडे जाणं होतं. या सणाच्या दिवसात पाऊस नसेल. तर चार ठिकाणी सहज फिरता येतं. सध्या मात्र गेले चार दिवस पडत असलेली पावसानं चाकरमान्यांच्या आंनदावर पाणी फेरलं आहे. संपूर्ण जिल्ह्यात हीच स्थिती आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्‍यात झाला असून, राजापूरमध्ये तब्बल 65.50 मिमी पाऊस पडला आहे. त्या खालोखाल चिपळूण तालुक्‍यामध्ये 48.40 पाऊस पडला आहे. तर मंडणगड, दापोली, खेड आणि लांजा या तालुक्‍यांमध्येही सरासरी 40 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला.

रायगड जिल्ह्यात पुढच्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सावित्री, कुंडलिका आणि आंबा नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका नदीनं गेल्या तीन दिवसांत दोन वेळा धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. अलिबाग, पेण, महाड, माणगाव , उरण, पोलादपूर या तालुक्‍यांना पावसानं झोडपलं आहे. प्रशासन पूर्णतः दक्ष असून महसूल विभागासह पूर नियंत्रण कक्ष सर्वत्र संपर्क ठेवून आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ

विदर्भात नागपूर, अकोला, वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे.नागपूर शहरात ही काल पासून चांगला पाऊस पडत आहे.गेले दोन महिन्यापासून विदर्भात पावसाने दडी मारली होती पण गेले दोन दिवसांपासून या परिसरात ही चांगला पाऊस पडत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची रखडलेली शेतीची कामे पुन्हा वेगाने सुरु झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)