राज्यभरात आता कालवा स्वच्छता अभियान

“सीएसआर’ची मदत घेणार : वहन क्षमता वाढणार

पुणे – गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने आता “कालवा स्वच्छता अभियान’ सुरू केले आहे. सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) यामधून हा निधी उभारला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कालवा स्वच्छता अभियान योजनेच्या माध्यमातून कॉर्पोरेट संस्था शासनाच्या प्रयत्नामध्ये सक्रीय भागीदार होऊ शकणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण गाळ व झाडे झुडपे काढल्यास कालव्याच्या वहनक्षमतेत वाढ होईल. तसेच कालव्याचे पाणी शेवटपर्यंत पोहचेल, असा दावा शासनाकडून करण्यात येत आहे.

राज्यात जलसंपदा विभागांतर्गत 49.57 लाख हेक्‍टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून 82 मोठे, 237 मध्यम व 3,299 लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून पाणी उपलब्धतेनुसार सरासरी 40 लाख हेक्‍टर क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचन होत आहे. सिंचनासाठी पाणी वितरीत करताना कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ येतो. तसेच पावसाळा कालावधीत कालव्यात गाळ येणे, कालवा फुटणे, कालव्यात गवत, झाडे-झुडपे आदींमुळे कालव्याची वहन क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी होते. प्रत्येक प्रकल्पाच्या कालव्याचे जाळे विस्तीर्ण व विखुरलेले असल्याने सर्व ठिकाणी एकाच वेळेस गाळ काढण्याची कामे करणे जिकीरीचे होत आहे.

दरवर्षी 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत कालव्यातील गाळ काढण्याच्या कामाचा कालावधी आहे. तसेच यानंतर धरणाच्या जलाशयातील गाळ काढण्याच्या कामाचा कालावधी जानेवारी ते जूनपर्यंत असा आहे. त्यामुळे कालवा स्वच्छता अभियान योजना राबविल्यास उपलब्ध असलेल्या यंत्रसामग्रीचा वर्षभर पूर्ण क्षमतेने वापर होईल. सामाजिक उत्तरदायित्व जबाबदारीमध्ये कॉर्पोरेट क्षेत्राने प्रकल्पांचे लाभधारक शेतकरी यांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा आणि बांधिलकीचा समावेश होतो. यासाठी कालवा स्वच्छता अभियान योजनेच्या माध्यमातून कॉर्पोरेट संस्था शासनाच्या प्रयत्नांमध्ये सक्रीय भागीदार होऊ शकणार आहेत.

कालव्यातून गाळ काढताना घ्यावयाची दक्षता
– कालवा स्वच्छता अभियानातंर्गत कामासाठी अशासकीय संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या आदींमार्फत काम करताना कालव्याच्या सुरक्षेस धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी कालवा सुरक्षेस धोका पोहोचत असेल तर त्या ठिकाणी कालवा स्वच्छता कामाची कार्यवाही तत्काळ थांबविण्यात यावी.
– कालव्यावरील कोणत्याही बांधकामास हानी पोहोचल्यास त्याची दुरुस्ती, नव्याने बांधणी संबंधितांनी त्यांच्या स्वखर्चाने तातडीने करून घ्यावी.
– कालव्यातील काढण्यात आलेल्या गाळ पुन्हा कालव्यात येणार नाही, यादृष्टीने दक्षता घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)