राजे विरुद्ध राजे संघर्षाचे पंचायत समितीत पडसाद

सातारा ः पंचायत समितीच्या मासिक सभेत उपस्थित सदस्य, सभापती, उपसभापती आणि अधिकारी

हप्तेवसुलीवरून साळुंखे अन सावंतांच्यात जुगलबंदी : पंचायत समिती सभा वादळी
सातारा, दि.29(प्रतिनिधी)- साताऱ्यात राजे विरुद्ध राजे संघर्ष शिगेला पोहचलेला असताना त्याचे पडसाद नगर पालिकेपाठोपाठ सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत ही दिसून आले. अतिक्रमणे व हप्तेखोरी मुद्‌द्‌यावरून खा. उदयनराजे समर्थक सदस्य रामदास साळुंखे व आ. शिवेंद्रसिंहराजे समर्थक जितेंद्र सावंत यांच्यात शाब्दिक जुगलबंदी झाली. तसेच सभेत कृषी व वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले.
सभापती मिलिंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पंचायत समितीच्या मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपसभापती जितेंद्र सावंत, गटविकास अधिकारी अस्मिता गावडे यांच्यासह सदस्य व विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
सभेदरम्यान, रामदास साळुंखे यांनी बांधकाम विभागाने ग्रामपंचायतींना अतिक्रमणे हटविण्याच्या नोटिसा बजावल्याचे निदर्शनास आणून देत ते म्हणाले, सातारा ते रहिमतपूर व सातारा ते कोरेगाव मार्गावर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.अतिक्रमण हटविण्यात येवू नये यासाठी ते व्यावसायिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हप्ते देत आहेत, असा गौप्यस्फोट साळुंखे यांनी केला. तसेच जर अधिकारी हप्ते घेत नसतील तर ते अतिक्रमणे किती दिवसात काढणार ? असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांनी अतिक्रमणे काढली तर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील सभागृहात करू असे साळुंखे यांनी सांगितले.
त्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे समर्थक व उपसभापती जितेंद्र सावंत यांनी संधी साधत,सातारा शहरात हप्ते कोण घेते हे सगळ्यांना महित आहे. तसेच संपूर्ण तालुक्‍याला देखील हप्ते कोण घेते हे चांगले माहितीय असे म्हणताच साळुंखे संतप्त झाले. साळुंखे म्हणाले, माझा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला आहे. उत्तर त्यांनीच दिले पाहिजे. सावंत यांना माझ्या प्रश्नावर बोलता येणार नाही. त्यावर बांधकामाच्या अधिकाऱ्याने खुलासा केला. ते म्हणाले, अतिक्रमणासाठी हप्ते घेत नाही हे कोऱ्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहोत. नगर पालिकेप्रमाणे आमच्याकडे अतिक्रमणे काढण्यासाठी पथक नाही परंतु लवकरात लवकर अतिक्रमणे काढण्यात येतील तसेच अतिक्रमणे काढण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने सहकार्य करायला हवे.
तसेच यावेळी कृषी व वीज वितरण विभागावर सदस्यांनी सडकून टीका केली. जितेंद्र सावंत म्हणाले, खरीप आढावा बैठकी दरम्यान पुरेशी बियाणे असल्याचे कृषी अधिकारी बागल यांनी सांगितले होते. असे असताना आता सोयाबीन चे बियाणे मिळत नाही. शासनाकडून आलेल्या बियाणे कोणाला दिले याची माहिती सादर करा असे कृषी अधिकाऱ्याला सुनावले. त्यावर अधिकाऱ्याकडे माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून येतात रामदास साळुंखे व संजय घोरपडे यांनी कृषीचा विशेष घटक योजनेचा दीड कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे. एकूणच कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात ठराव करण्याची मागणी सदस्यांनी केली. तसेच यावेळी आशुतोष चव्हाण यांनी कृषी पंपाची कनेक्‍शन प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केला तर राहुल शिंदे यांनी वरने येथे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. त्या कुटुंबियांना अद्याप महावितरणने मदत दिली नाही तसेच अशा घटना सातारा तालुक्‍यात पावसाळ्याच्या काळात घडू नयेत यासाठी महावितरणने दक्षता घेण्याची मागणी केली. तसेच अजिंक्‍यतारा किल्ला मार्गासाठी निधी आला आहे. हा परिसर गोडोली गणात आहे. या गणासाठी बांधकाम अधिकारी असताना त्या कामासाठी दुसरा अधिकारी नेमण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित केला. त्यावर सभापतींनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, सभेच्या सुरुवातीला प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे सर्व सदस्यांनी स्वागत केले. सभापती मिलिंद कदम यांनी 1 जुलै रोजी प्रभात फेरी काढण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या असल्याचे सांगितले. तसेच यावेळी अजिंक्‍यतारा कारखान्याने एफआरपीप्रमाणे दर दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव राहुल शिंदे यांनी मांडला तसेच सातारा तालुक्‍यातील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील यावेळी करण्यात आला.

सातारा तालुक्‍यात 68 कुपोषित बालके
सातारा तालुक्‍यात 68 बालके कुपोषित असल्याची माहिती यावेळी बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितली. त्या बालकांना 60 दिवस आहार व औषधे ही अंगणवाडी सेविका देण्यात येणार असून त्यानंतर ती मुले सुदृढ होतील तसेच त्या बालकांची गाव व पंचायत समिती गण निहाय माहिती सदस्यांना देणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेमके सभापती कोण?
सभेदरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर खातेप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांनी उत्तर देणे अपेक्षित असते. त्या उत्तरावर सदस्याचे समाधान झाले नाही तर पुढील कार्यवाही व आवश्‍यकता वाटल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्याचे अधिकार सभेचे अध्यक्ष व विद्यमान सभापती यांना असतात. मात्र विसंगत प्रकार सातारा पंचायत समितीच्या सभेत दिसून आला. सदस्यांच्या उपस्थित प्रश्नांवर खुलासा तसेच आदेश देण्याचे काम उपसभापती जितेंद्र सावंत हे करताना दिसून येत होते. त्यामुळे नेमके सभापती कोण हा प्रश्न मिलिंद कदम यांच्यासह सभागृहाला पडल्याचे यावेळी दिसून आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)