राजेवाडी येथे विद्यार्थ्यांनी घेतली पक्षी संवर्धनाची प्रतिज्ञा

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील राजेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीमुळे दोनशे झाडांना रिकाम्या बिसलरी बाटल्या बांधून सलाईन म्हणून सुतळीचा वापर करून त्यामध्ये दररोज पाणी ओतून भर उन्हात थेंब-थेंब पाणी ठिबक सिंचनद्वारे देण्याचा अभिनव उपक्रम यावेळी सुरु करण्यात आला.

सिमेंटच्या जंगलामुळे व मोबाइल टॉवर्समुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. चिमण्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. याच भावनेतून शाळेतील विद्यार्थ्यांनी काड्या, कापूस, गवत यांचा वापर करुन पुठ्ठ्यांची घरटी तयार केली. त्यामध्ये दाणे ठेवून झाडांना घरटी बांधण्यात आली. तसेच झाडांच्या बुंध्याजवळ मातीची मडकी ठेवून त्यामध्ये पाणी ठेवण्यात आले. यावेळी मुलांनी दररोज घरट्यांत पक्षांसाठी दाणे व पाणी ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमाचे नियोजन राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक लहू घोडेकर, सहशिक्षक एकनाथ मदगे, यमना साबळे यांनी केले. अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक गटशिक्षणाधिकारी पोपट महाजन, शिक्षणविस्तार अधिकारी रामदास पालेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)