राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे

कात्रज – राजीव गांधी प्राणी संग्रालायातील घुबड चोरीच्या घटनेनंतर जागे झालेल्या प्रशासनाने 15 लाख खर्च करून 29 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्यातील एकही सुस्थितीत नसून पूर्णवेळ ऑपरेटर नाही. 40 सुरक्षा रक्षक गस्तीवर तैनात असून त्यांच्याकडे ओकी-टोकी नसल्याचे त्यांच्या संपर्क साधला जात नाही. तसेच संग्रहालयाची कात्रज-कोंढवा रस्त्याकडील सीमा भिंत तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था रामभरोसेच असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
पुणे महानगरपालीकेच्या वतीने चालवले जाणारे कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाअंतर्गत समस्यांची माहिती नगरसेवक युवराज बेलदरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ कार्यकर्ते व पत्रकारांसह पाहणी केली. याप्रसंगी प्राणी संग्रालयात विविध समस्या समोर आल्या. याबाबत नगरसेवक युवराज बेलदरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
पुणे महानगरपालीकेच्या वतीने चालवले जाणारे राजीव गांधी प्राणी संग्रालय हे देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने चालवले जाणारे पहिले प्राणी संग्रहालय आहे. या ठिकाणी वर्षभर सुमारे 20 लाख पर्यटक भेटी देत असतात. त्यामुळे प्राण्यांची देखभाल व पायाभूत सोयी-सुविधा, पर्यटकांना आवश्‍यक सुविधा पुरवणे क्रमप्राप्त आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने सर्वकाही सुरळीत चालले असल्याचा आव राजीव गांधी प्राणी संग्रालय प्रशासनाकडून आणला जात आहे.
पुणे शहरासह महाराष्ट्र व बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी संग्रालयातील भ्रमतीसाठी बॅंटरीवरील वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आठ वाहने असून त्यातील चार वाहने महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे 40 रुपये एवढे शुल्क देवूनही पर्यटकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. या समस्येमुळे पर्यटकांची निराशा तर होतेच मात्र पालिकेला मिळणारा महसूल बुडत आहे.

प्रवेशद्वार अतिक्रमणाच्या विळख्यात !
राजीव गांधी प्राणी संग्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर अनाधिकृत हातगाडी व पथारीवाले यांची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. तसेच दुतर्फा बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात. त्यामुळे प्रवेशद्वाराचे मोठा प्रमाणात विद्रुपीकरण तर होतेच पण पर्यटकांना अडचणीचा सामाना करावा लागतो. या संदर्भात संबंधित अतिक्रमण विभागाकडे पाठपुरावा करणे अपेक्षीत असते. मात्र त्याची तसदी प्राणी संग्रहालय प्रशासन घेताना दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)