राजा शिवछत्रपती संस्था, सुवर्णयुग, शारदा फौंडेशन उपान्त्य फेरीत

मुलांच्या गटांत भैरवनाथ, महाराणा मंचर, राणाप्रताप कळंब, राणाप्रताप पुणे उपान्त्यपूर्व फेरीत

कुमार गट मुले व मुली जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

-Ads-

पुणे – राजा शिवछत्रपती संस्था, सुवर्णयुग, शारदा फौंडेशन या संघांनी मुलींच्या उपान्त्य फेरीत, तर भैरवनाथ, महाराणा मंचर, राणाप्रताप कळंब, राणाप्रताप पुणे, उत्कर्ष क्रीडा संस्था या संघांनी मुलांच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारताना पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व काळभैरवनाथ विकास प्रतिष्ठान आयोजित कुमार गट मुले व मुली जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला.

खराडी येथील कै. राजाराम भिकू पठारे प्राथमिक विद्यालयाच्या कै. वि. मा. पठारे इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या गटातील चुरशीच्या सामन्यात राजा शिवछत्रपती संस्था संघाने महेशदादा स्पोर्टस फौंडेशन संघावर 28- 26 असा निसटता विजय मिळवीत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. हा सामना निर्धारित वेळेत 22-22 समान गुणांवर संपल्यावर टायब्रेकरमध्ये राजा शिवछत्रपती संघाच्या वसुंधरा जायभायने महेशदादा स्पोर्टस फौंडेशनच्या नम्रता रायकरची पकड घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

मुलींच्या विभागात सुवर्णयुग संघाने बारामती फौंडेशन संघावर 25-24 असा एक गुणांने विजय मिळवित उपान्त्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला सुवर्णयुग संघ 8-17 असा पिछाडीवर होता. मुलींच्या तिसऱ्या सामन्यात बारामतीच्या शारदा फौंडेशन संघाने राजमाता जिजाऊ संघावर 32-26 गुणांनी विजय मिळवित उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविला.
कुमार गट मुलांच्या उपउपान्त्यपूर्व सामन्यात राणा प्रताप संघाने सुवर्ण स्पोर्टस संघावर 37-34 असा निसटता विजय मिळविला. मध्यंतराला राणा प्रताप संघाकडे 13-12 अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. राणा प्रताप संघाच्या शुभम शेळके याच्या चौफेर व वेगवान चढाया आणि ओंकार पोकळे याने घेतलेल्या चढायांमुळे हा सामना जिंकला. सुवर्ण स्पोर्टस संघाच्या सुजीत डोकेच्या चढाया व किशोर भोसलेच्या पकडी उत्कृष्ट होत्या.

मुलांच्या गटातील अखेरच्या सामन्यात भैरवनाथ संघाने शिवनेरी जुन्नर संघावर 36 -20 असा विजय दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला भैरवनाथ संघाकडे 18-9 अशी आघाडी होती. अक्षय वढाने व संकेत लांडगे याने केलेल्या चौफेर चढाया व त्यांना हर्षल मानेने घेतलेल्या पकडीची मिळालेली साथ यामुळे भैरवनाथ संघाने हा सामना जिंकला.
शिवनेरी जुन्नर संघाच्या विघ्नहर शेटे व औंकार दातखिळे यांनी चांगल्या चढाया केल्या तर सौरभ काळे याने काही सुरेख पकडी घेतल्या. मुलांच्या अन्य सामन्यात महाराणा मंचर संघाने राकेशभाऊ कबड्डी संघाचा 37-36 असा पराभव करीत आगेकूच केली. तर राणा प्रताप कळंब संघाने श्री शिवाजी व्यायाम मंडळाचा 34-17 असा आणि उत्कर्ष क्रीडा संस्था (अ) संघाने सह्याद्री कबड्डी संघाचा 61-17 असा धुव्वा उडविला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)