राजा शिवछत्रपती संघाला कुमार मुलींच्या गटांत विजेतेपद 

file photo

कुमार गट मुले व मुली जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 
पुणे – चुरशीच्या अंतिम सामन्यात राजा शिवछत्रपती संघाने धर्मवीर बालेवाडी संघाचा पराभव करताना कुमार गट मुले व मुली जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील कुमार गट मुलींच्या विभागात विजेतेपद पटकावले. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व काळभैरवनाथ विकास प्रतिष्ठान यांनी संयुक्‍तपणे या स्पर्धेचे आयोजन केले होते. खराडी येथील कै. राजाराम भिकू पठारे प्राथमिक विद्यालयाच्या कै. वि. मा. पठारे इनडोअर स्टेडियममध्ये कुमार गट मुलींच्या अंतिम सामन्यात राजा शिवछत्रपती संस्था संघाने धर्मवीर बालेवाडी संघावर 29 – 20 अशा 9 गुणांनी विजय मिळवीत निवड चाचणी स्पर्धेचे विजेतपद पटकावले. मध्यंतराला राजा शिवछत्रपती संघाकडे 14-11 अशा गुणांची आघाडी होती. मानसी रोडे व सिद्धी पोळ यांच्या खोलवर चढाया व प्रतीक्षा दाभाडे हिच्या पकडींच्या जोरावर राजा शिवछत्रपती संघाने हा सामना जिंकला.

पहिल्या डावात मानसी रोडेने 6 बोनस गुण मिळविले, तर दुसऱ्या डावात सिद्धी पोळ हिने 5 बोनस गुण वसूल केले. प्रतीक्षा दाभाडे हिने सामना संपण्यास अवघे पाच मिनिटे बाकी असताना दोन वेळा सुपर टॅकल घेत आपल्या संघाची आघाडी वाढविली. त्यामुळे राजा शिवछत्रपती संघावा हा सामना जिंकता आला. धर्मवीर प्रतिष्ठानच्या तेजल पाटील व समृद्धी कोळेकर यांनी चांगली लढत दिली. मात्र त्यांचा बचाव कमी पडला. मानसी रोडे व सिद्धी पोळ यांचे आक्रमण थोपविण्यात अपयश आल्याने धर्मवीर प्रतिष्ठान संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

त्याआधी कुमार गट मुलींच्या पहिल्या उपान्त्य सामन्यात राजा शिवछत्रपती संघाने सुवर्णयुग संघाचा 23-16 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. मध्यंतराला राजा शिवछत्रपती संघाकडे 12-7 अशी आघाडी होती. तसेच दुसऱ्या उपान्त्य सामन्यात बालेवाडीच्या धर्मवीर प्रतिष्ठान संघाने बारामतीच्या शारदा प्रतिष्ठान संघावर 32-15 असा विजय मिळवीत कुमार गट मुलींच्या गटात अंतिम फेरी गाठली होती. मध्यंतराला धर्मवीर संघाकडे 16- 7 अशी आघाडी होती.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे, स्पर्धा मुख्य संयोजक माजी आमदार बापू पठारे, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबूराव चांदेरे, पंढरीनाथ पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, भय्यासाहेब जाधव, संजीला पठारे, सुमन पठारे, महादेव पठारे, वडगाव शेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष नारायण गलांडे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, उपकार्याध्यक्ष राजेंद्र देशमुख, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, सरकार्यवाह मधुकर नलावडे, सहकार्यवाह बलराज वाडेकर, राजेंद्र आंदेकर, योगेश यादव, शिल्पा भंडारी, स्पर्धा पंच प्रमुख आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे, स्पर्धा निरीक्षक नीलेश लोखंडे, भाऊसाहेब करपे,रविंद्र वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)