राजापूरचा आंबोजी राजाचा वाडा नामशेष होण्याच्या मार्गावर

राजापूर : आंबोजी राजाचा पुरातन वाडा.

इतिहासाचा साक्षीदार जतन करण्याची ग्रामस्थांची मागणी

प्रकाश राजेघाटगे
बुध, दि. 24 – ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या राजापूर (ता. खटाव) येथील 350 वर्षापूर्वीचे दगडी रेखीव हेमांडपंथी बांधकाम ढासळू लागले आहे. या इतिहासकालीन देण्याचे पुरातत्व विभागाने जतन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बुध पाचेगावचे संस्थानिक राजे आंबोजीराजे राजेघाटगे यांनी हे बांधकाम केले आहे. या बांधकामामध्ये जानुबाई देवी मंदिराचा एक परिसर व तीन एकर परिसरातील वाड्याचा समावेश आहे. जानुबाई देवी हे ग्रामदैवत असून देवीचा मुख्य उत्सव फेबुवारी माहिन्यामध्ये द्वितीयेला येतो. त्यावेळी देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. नवरात्र उत्सवही या ठिकाणी मोठ्या थाटात साजरा होतो.
संपूर्ण मंदिराचे बांधकाम दगडी असून एक एकर परिसरामध्ये 12 फूट उंचीचा दगडी तटबंदी, मुख्य प्रवेशद्वाराला केलेली कमान पेक्षणीय आहे. त्यालगतच असले 35 फूट उंचीची दीपमालाही लक्ष वेधून घेते. यात्रेचा कालावधी व नवरात्रोत्सवात कापूर, खळ तेलाने ही दीपमाळ प्रज्वलीत केली जाते. मंदिराजवळ नागरखाना असून या इमारतीची उंची 52 फूट आहे. मंदिराला चिकटून असलेल्या राजवाड्यातून महाराजांना देवीच्या दर्शनासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आलेला आहे. मंदिरामध्ये जामिनीवरही दगड उभारण्यात आले असून संपूर्ण दगडी बांधकाम चुन्याच्या सहाय्याने तयार करण्यात आले आहे.
बुध-पाचेगाव संस्थानाचे राजे आंबोजीराजे राजेघाटगे हे मूळचे कागल येथील असून ग्वाल्हेर येथे मोठा पराक्रम केल्यानंतर हा वाडा त्यांना बक्षिस मिळाला आहे. तीन एकर परिसरातील या वाड्यामध्ये तीन छोटे वाडे असून पूर्वी या वाडयात कारंजे’ बागेत विहीर दरबार कचेरी होती. परंतु, कालांतराने हे सर्व नष्ट होत गेले. या वाड्याला चारही बाजूंनी दगडी तटबंदी असून तटबंदीची उंची सुमारे 25 फूट आहे. वाड्यामधून मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी एक भुयारी मार्ग आहे. दरबार कचेरीला जुना चुन्याचा स्लॅब आहे. वाड्यामध्येच एकदोन मजली इमारत असून या ठिकाणी पूर्वी कचेरी चालायची. आंबोजीराजे राजेघाटगे यांचा वाडा व मंदिर म्हणजे स्थापत्य शासनाचा एक उत्कृष्ट नमुना पहाण्यासारखा आहे. पूर्वी संपूर्ण गावात तटबंदी होती. पण सध्या तटबंदी नसून चार प्रवेशाद्वारापैकी दोन प्रवेशद्वारे सुस्थितीत आहेत. खटाव तालुक्‍यातील इतिहासकालीन वारसा जपण्यासाठी या वाड्याकडे व मंदिराकडे पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे व त्याची देखभाल करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. सध्या आंबोजीराजे राजेघाटगे यांची आठवी पिढी अस्तित्वात असून येत्या काही वर्षामध्ये या पुराणकालीन वास्तुची देखभाल झाली नाही तर ही सुंदर वास्तू काळाच्या ओघात नष्ट होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)