राजहंस दूध संघाच्या टॅंकरने वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा

संगमनेर, दि. 18 (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्‍यातील काही गावे व वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई भासत आहे. त्या ठिकाणी राज्याचे महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाचे पाण्याचे टॅंकर पोहोचत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने दूध संघाचे टॅंकर अनेक गावांना, वाड्यावस्त्यांना वरदान ठरत आहेत. त्याचबरोबर दररोज किती गावांना व वाड्यावस्त्यांना टॅंकर पोहोच झाले याबाबतही आ. थोरात दररोज पाणीटंचाईचा आढावा घेत आहेत.
संगमनेर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. दरवर्षी पावसाळ्यात कमी-जास्त प्रमाणात पाऊस होत असतो. त्यामुळे ओढे, नाले, सिमेंट बंधारे, पाझर तलाव भरतात तर कधी भरतही नाहीत. पण, उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे कोरडेठाक पडतात. मग महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. आ. थोरात यांनी पंचायत समितीच्या हॉलमध्ये आढावा बैठक घेवून प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना केल्या होत्या. तरीही अनेक गावे व वाड्या-वस्त्यांना टॅंकर सुरू झाले नव्हते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे पाण्यावाचून हाल होवू नयेत म्हणून आ. थोरात व दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका दूध संघाचे टॅंकर सुरू करण्यात आले आहेत.
तसेच, आ. थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात टॅंकर सुरू करण्यासंदर्भात नागरिक येत असून, ज्या गावांना व वाड्यावस्त्यांना टॅंकर पाहिजे त्यांना दूध संघाचे टॅंकर देण्यात येत आहेत. त्यामुळे पिण्याचा व जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागत आहे. शासनाचा टॅंकर सुरू होईपर्यंत नागरिकांना दूध संघाच्या टॅंकरचा आधार मिळत आहे. कोणत्या गावांना व वाड्यावस्त्यांना दररोज किती टॅंकर पोहोच झाले याचा आ. थोरात दररोज पाठपुरावा करत असतात.
उद्‌भवलेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी ग्रामीण भागात वाडीवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना टॅंकरने पिण्याचे पाणी पुरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख व संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेवून राजहंस दूध संघाने राज्यात आपला लौकिक निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)