राजर्षी शाहूंची मूल्यदृष्टी जोपासण्याचा प्रयत्न व्हावा

प्रा. पुष्पा भावे यांचा राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मान 

कोल्हापूर – छत्रपती राजर्षी शाहूंची मूल्यदृष्टी विशाल आणि मूलगामी होती, त्यांची मूल्यदृष्टी जोपासण्याचा समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांना येथील शाहू स्मारक भवनमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे हे होते. समारंभास राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, सौ. रोहिणी सुभेदार, ट्रस्टचे सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

समाजातील वंचित, पिडीत अशा सर्वसामान्य माणसासाठी मूलभूत मूल्यदृष्टीने काम करुन राजर्षि शाहुंच्या तत्वज्ञानाचा विचार जागृत ठेवावा, असे सांगून प्रा. पुष्पा भावे म्हणाल्या, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करुन देणे काळाची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकांच्या प्रश्नांची उकल करुन मूल्यदृष्टी जोपासण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. राजर्षि शाहूंनी त्या काळी वंचित घटकांसाठी मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली. शाहूंचे कार्य आणि विचार समाजाला प्रेरक आणि पोषक असल्याचेही त्या म्हणाल्या. समता प्रेमी, सामान्यांचा कैवारी, रयतेचा राजा अशा द्रष्ट्या लोकराजा शाहू महाराजांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज याप्रसंगी बोलताना म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी आपल्या जीवनात सामान्य माणसासाठी अभुतपूर्व काम केले असून शाहूंचे हे कार्य आणि विचार समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणादायी आहे. राजर्षि शाहूंच्या विचारांची प्रत्यक्ष कृतीतून जोपासना करणाऱ्या प्रा. पुष्पा भावे यांना यंदाचा शाहू पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. राजर्षि शाहूंनी केलेला आरक्षणाचा कायदा महत्वाचा असून देशातील महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये 50 टक्के आरक्षण मिळावे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)