राजधानीत उदयनराजेच नाही, तर कायदाही चालतो !

संदीप राक्षे
सातारा- पेशवाईच्या काळात आनंदीबाई पेशवा यांनी ‘ध’ चा ‘मां’ करून जो गृहकलह माजवला त्यात नारायणरावांचा हकनाक बळी गेला. पेशवाईत साडेतीन शहाण्यांचे बारभाईचे कारस्थान सुद्धा चांगलेच गाजले होते.त्याचाच प्रत्यय पुन्हा येउ लगला आहे.काळ्या कोटवाल्यांनी थेट मुंबईवरून हाळी दिली मिळाले हो मंगळवार तळे मिळाले हो. ही सुवार्ता बुलेट ट्रेनच्या वेगाने साताऱ्यात पोहचली आणि सगळ्यांना हायसे वाटले. नगराध्यक्षांना सुध्दा दिवाळी साजरी करावीशी वाटली.

आमचा थोरल्या महाराजावरचा विश्वास इतका गाढ की काही जणांनी व्हॉटस्‌ ऍपला मंगळवार तळ्याचे स्टेटस ठेवत महाराजांनी लोकसभेची लढाई जिंकल्याचा आव आणला. पण मंगळवार तळ्याच्या पाण्यात आंतरविरोधाचे रंग इतके बेमालूम मिसळलेत की विचारण्याची सोय नाही. पालिकेच्या विशेष सभेत ज्यांनी मंगळवार तळ्यासाठी एकमुखाने नारा दिला त्यांना कायद्यापुढे सपशेल तोंडघशी पडावे लागले.

थोरल्या महाराजांनी मी तळे देतो असे दबंग स्टाईलने सांगत राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पण मै खडा तो सरकारसे बडा असे म्हणणाऱ्या उदयनराजेंना’ तु खडा तो कानून भी बडा ‘ असा अनुभव नक्कीच आला असेल. काही वर्षापूर्वी थेट आयपीएस असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने कायद्याची जरब मोठी असतेच फक्त तो कायदा वाकवणाऱ्यांना त्याचा धाक बसवता आला पाहिजे.

साताऱ्यात मंगळवार तळ्याच्या विसर्जनावरून पालिकेने स्वतःची पुरती अब्रू काढून घेतली. सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्‍यात जो निरोप जायचा तो गेलाच. उदयनराजेंच्या तोफांच्या दिशा फलटण वर रोखून आग ओकित असताना एखादा बॉम्ब कोरेगावात फुटावा या अनपेक्षित गनिमी काव्याने हुमगावकर घायाळ झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात मिळालेली राजकीय झप्पी काय होती ? याचेच आश्‍चर्य कोरेगावकरांना वाटले. सध्या उदयनराजेंचा सात्विक संताप होतोय तो साताऱ्यातच होणाऱ्या कोंडीचा. डॉल्बीचा प्रश्न प्रतिष्ठेचा करून उदयनराजेंनी थेट कायद्यालाच आव्हान दिले आहे. पण साताऱ्याचा बच्चन स्प्रिंग बॉल आहे. जास्त ताणायचे नाही कधी उसळेल याचा नेम नाही.

सातारा पालिकेत काही नवकोट नारायण ओळीने ठाणं मांडून बसलेत. सातारकरांच्या श्री विसर्जनाचा काही नारायणांना फारच कळवळा आला आहे. कृत्रिम तळ्यांचे अर्थकारण इतके अगाध आहे की काहीतरी दिल्याशिवाय आम्ही काहीच करत नाही. पन्नास लाखाच्या तुलनेत श्री विसर्जनाच बजेट किमान तीस पस्तीस लाखापर्यंत खेचता येतय का ? याचा अंदाजही घेऊन झाला आहे. बर हा खेळ एकतर्फा नाही त्यात विरोधकांचे सुध्दा सामिलीकरणं आहे. विरोध करायचा पण किती यांची परिमाणे सुद्धा ठरली आहेत. इथचं जे टक्केवारीच राजकारण चालतय ना त्याचा सातारकरांना मोठा संताप आहे.

बांधकाम विभागात एक महाशय टक्केवारी शिवाय बोलतच नाही. त्यांच जे काही असतं ते दोन टकक्‍यात त्यामुळेच कृत्रिम तळयाची चणचण काही रिकाम्या खिशांना जाणवायला लागली पण घशात तीर्थ पडावे आणि सुखाचा अनुभव व्हावा तसे काहीजण सुखेनैव तळ्याच्या काठाने बागडत असतात. काही जणांच्या काळ्या कोटात कायद्याची सोयीस्कर पुडी असते. परवा ती अशीच मुंबईवरून सोडण्यात आली पण सावकाशपणे मंगळवार तळ्याचा साप सोडायला पण ते विसरले नाहीत म्हणजेच खोटा कळवळा दाखवून राजकीय स्टंट करण्याचा हा प्रयत्न अत्यंत लाजिरवाणा म्हणावा लागेल.

जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याने चापटल्यावर साताऱ्यातील बच्चन एअरलाईन्सची विमाने यथावकाश जमिनीवर आली. तेरा किलोमीटरवरच्या कण्हेर खिंडीचा नाद सोडला जाईल आणि पुन्हा फोकस आता गोडोली तळ्यावर असेल पण साताऱ्यात उदयनराजेंइतकाच कायदा सुध्दा चालतो हा मेसेज देण्यात प्रशासन सध्या यशस्वी झालं आहे.

इथे राजकीय बंदुका ताणलेल्याच
सातारच्या गादीचे दोन “वंशज’ सध्या रस्त्यावरचा राडा करीत आहेत. उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे यांच्यातील “राडा’ आता कौटुंबिक, व्यक्तिगत राहिला नसून समस्त सातारकर व मराठी माणसाला त्यामुळे वेदना होत आहेत. अजिंक्‍यतारा किल्लाही आता अश्रू ढाळीत असेल. सुरूची राडा प्रकरण हा मनोमिलनाच्या मधुर संबधात पडलेला तसा मिठाचा खडाच.इतिहास घडविणाऱ्या घरातील वंशजच जेव्हा आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरतात तेव्हा काय होते? या प्रश्नाचे साधे-सोपे उत्तर म्हणजे, “सातारच्या छत्रपतींच्या गादीचे वारसदार होय!’साताऱ्यातील दोन भोसल्यांत सध्या जे धुमशान सुरू आहे ते पाहता सगळेच मर्द मराठे अस्वस्थ असतील. “एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा ज्यांच्या प्रेरणेतून देण्यात येत आहे त्या शिवरायांच्या दोन वंशजांनी साताऱ्यातच एकमेकांच्या छातीवर मरण्या-मारण्यासाठी बंदुका रोखल्या आहेत. हे पाहून शिवरायांचा ऐतिहासिक अजिंक्‍यताराही अश्रू ढाळत असेल.

अजिंक्‍यताऱ्याने जे पाहिले, जे सहन केले, जे उपभोगले त्याला मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही. शहाजीराजांपासून ते थेट शेवटच्या प्रतापसिंगांच्या करुण इतिहासाचा हा अजिंक्‍यतारा साक्षीदार आहे. अजिंक्‍यताऱ्याने आयुष्यभर जखमा आणि वेदनाच भोगल्या. आजही सातारच्या गादीच्या दोन वारसदारांतील शाब्दिक तलवारबाजी आणि राजकीय बंदुकबाजी बघून अजिंक्‍यतारा अश्रूच ढाळीत असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)