राजगुरू यांच्या स्मारकासाठी आराखड्याच्या बाराखडी…

रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर- वर्षामागून वर्षे सरत आहेत, निवडणुकांमागून निवडणुका होत आहेत. निवडणुकीत प्रचारासाठी आलेले मंत्री, निवडून आलेले खासदार, आमदार केवळ आश्‍वासनांची खैरात करीत गेले. येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ काम मात्र, शून्य आहे. गेली दहा वर्षांपासून या महान देशभक्‍ताच्या जन्मस्थळाचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्यासाठी आराखड्यामागून आराखडे झाले; मात्र या थोर क्रांतिकारकांची स्वातंत्र्यानंतर उपेक्षाच झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या आणि तमाम राजगुरूप्रेमींच्या भावनांशी जणू खेळ खेळला जात असल्याची प्रचिती राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे येत आहे. या राष्ट्रीय स्मारकाला कधी निधी मिळणार? हा मोठा प्रश्‍न सर्वांना सतावत आहे. उदासीन शासन, अकार्यक्षम प्रशासन आणि मतांचे राजकारण करणारे तालुक्‍यातील नेते अनभिज्ञ अशी परिस्थिती हुतात्मा राजगुरू स्मारकाच्या बाबत बनली आहे.

देश स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षे होत आली मात्र, हुतात्मा राजगुरू या थोर क्रांतिकारकाचे राष्ट्रीय स्मारक मात्र, बनले नाही. या जन्मस्थळ वाड्यात हुतात्मा राजगुरू यांची जन्मस्थळ खोली, थोरला वाडा आणि त्यातील देवघर, व्यायाम खोली, अभ्यासाच्या खोलीचे काम झाले आहे. शासनाकडून भरीव तरतूद होत नसल्याने देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ स्मारकाचे सुशोभिकरण, अतिक्रमणे हटविणे, परिसराचा विकास आणि अत्याधुनिक सेवा सुविधा करता येत नाहीत. या राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य आणि केंद्र शासन पातळीवर याचा पाठपुरावा होत नसल्याने या जन्मस्थळास भरीव तरतूद होत नाही.

दरवर्षी, अर्थसंकल्पात शासन हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद होईल, या भाबड्या आशेवर राजगुरुनगरसह तालुक्‍यातील नागरिक निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून आतपर्यंत अनेक अर्थसंकल्प सादर झाले. मात्र येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाला यात स्थान मिळालेच नाही. 2017मध्ये मंत्रालय मुबई येथे हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी सर्व विभागाच्या अधिकारी, पदाधिकारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुणे जिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी सौरव राव, जिल्हा नियोजन अधिकारी, स्थानिक नागरिक यांची मुंबई मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पुन्हा खासगी संपादनासह 82 कोटींचा आराखडा सादर केला होता; मात्र त्याचे पुढे काय झाले, याचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

अर्थसंकल्पात तरतूद झालेले पाच कोटी गायब
भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजगुरू स्मारकासाठी भरीव निधीची तरदूत करावी अशी मागणी केली. स्मारकाचा प्रस्ताव 78 कोटींचा असताना केवळ 5 कोटींची तरतूद केली; मात्र हा निधी अद्याप आलाच नाही. उलट जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी 5 कोटी निधी सुरुवातीच्या कामासाठी कमी पडत असल्याचे कारण देत 25 कोटी निधी मिळण्याचे शासनाला कळविले. मात्र हा निधी आलाच नाही उलट अर्थसंकल्पात तरतूद झालेले पाच कोटी गायब झाले यामुळे हे सरकार किती उदासीन अधिकारी किती अकार्यक्षम आहेत याचा अनुभव राजगुरुनगरवासीय घेत आहेत.

निधी अडकला लालफितीत
हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक बनविण्यासाठी खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सात वर्षांत प्रथम 38 कोटींचा आराखडा बनविण्यात आला. त्यानंतर 2014 मध्ये 54 कोटींचा आराखडा तयार करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून प्रथम 25 कोटी त्यानंतर 56 कोटींचा आराखडा बनवण्यात आला. वर्षानुवर्षे हे आराखडे शासनस्तरावर पडून राहिले. त्यानंतर 2016 मध्ये पुन्हा नव्याने 78 कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. तोही शासनाच्या लालफितीत अडकला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)