राजगुरूनगर शहरातील दारुदुकाने सुरुच करू नयेत

महाविद्यालयीन विद्यार्थिनींची मागणी ः न्यायालयाचा निर्णय बदलण्याची शक्‍यता
राजगुरुनगर  -मद्यविक्रीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शहरात दारूची दुकाने सुरु होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ही दुकाने पुन्हा सुरु झाल्यास राजगुरुनगर शहरातील महिलांना, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना याचा मोठा त्रास होणार आहे. शासनाने बंद केलेली राजगुरूनगर शहरातील दुकाने सुरुच करू नयेत, अशी मागणी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महामार्गावरील सर्वच दारूची दुकाने बंद करण्यात आली होती. खेड तालुक्‍यात शहरी व ग्रामीण भागात 126 शासनमान्य दुकाने आहेत. त्यापैकी तालुक्‍यातील 16 देशी-विदेशी दारु दुकाने, 57 परमिट रुम, 39 बियर शॉपी अशी 114 दुकाने बंद करण्यात आली होती. तर महामार्गापासून दूर असलेली 12 दुकाने सुरु होती. त्यानंतर शहराच्या बाहेर महामार्गावरील काही बड्या दुकानदारांनी शासकीय अधिकारी हाताशी धरून दुकानाचे महामार्गापासूनचे अंतर मागच्या बाजूने दाखवून हॉटेल्स सुरु केली. कायद्याचा दुरुपयोग करून अधिकारी आणि पोलिसांना हाताशी धरून काही दारूची दुकाने सुरु झाली; मात्र ती शाळा, महाविद्यालय मंदिरे, गर्दीची ठिकाणांपासून दूर असल्याने त्यांचा जास्त त्रास पाच महिने जाणवला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील परमिट रुम व दारू दुकाने संपूर्णपणे बंद झाली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानंतर महामार्गावरील बंद केलेली दारूची दुकाने पुन्हा सुरु होणार असल्याचे संकेत दिल्याने तळीरामांच्या त्रासाचा महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सामना करावा लागणार आहे. खेड तालुक्‍यात पुणे-नाशिक महामार्ग क्रमांक 50, तळेगाव शिक्रापूर महामार्ग क्र. 115, आणि आळंदी-लोणीकंद महामार्ग क्र. 103, शिरुर-भिमाशंकर या राज्य मार्गावरील 100पेक्षा जास्त दारुची दुकाने बंद आहेत. ती पुन्हा सुरु होणार असल्याची शक्‍यता आहे.
राजगुरुनगर शहरातील अनेक दुकाने पुणे-नाशिक महामार्गावर आहेत. महामार्गावरील या दारूच्या दुकानच्या लगतच महाविद्यालये, दवाखाने, मंदिरे, एसटी बसस्थानक आहे. अशा वर्दळीच्या ठिकाणी दारूची दुकाने असणेच गैर असताना आणि ही माहिती लपवून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून यापूर्वी ती सर्रास खुलेआम सुरु होती. या दुकानात आलेल्या तळीरामाचा मोठा त्रास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होत आहे. बसस्थानकात आलेल्या महिलांची रस्त्याने जाणाऱ्या महिलांची मोठी छेडछाड होत होती. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्याची पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष करीत होता. चिरीमिरी घेऊन दुकानदारांना संरक्षण दिले जात होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर पाच महिन्यांपूर्वी बंदी घातल्याने तळीरामांकडून महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र ही दुकाने सुरु होणार असल्याने पुन्हा महिलाची सुरक्षा धोक्‍यात आली आहे.

  • शाळा-महाविद्यालयांजवळ दुकाने नकोतच
    राजगुरुनगर शहरातील बाजार समिती, एसटी आगार, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, सिद्धेश्वर मंदिर, पुणे-नाशिक महामार्गावरील खासगी दवाखाने या परिसरात बंद केलेली दारूची दुकाने सुरु करण्यास परवानगी देऊ नये. शाळा महाविद्यालयापासून अगदी शे-दोनशे मीटरवरील दारूची दुकाने बंद करावीत, अशी मागणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि सहरातील महिलांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)