राजगुरूनगर-भीमाशंकर रस्त्यावर जीव घेणे खड्डे

राजगुरूनगर- राजगुरुनगर येथे राजगुरुनगर-भीमाशंकर रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडून त्यात अनेक नागरिक, महिला आणि शाळकरी मुले पडल्याने जखमी झाले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून येथील नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने येथे साचलेल्या गटाराच्या आणि पावसाच्या घाण पाण्यातून नागरिकांना जावे यावे लागत असल्याने आज अखेर नागरिकांनी या खड्ड्यांच्या ठिकाणी शासनाचा निषेध करीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
राजगुरूनगर-भीमाशंकर या 56 क्रमांच्या राज्यमार्गावर राजगुरुनगर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडले आहेत. सर्वाधिक मोठे खड्डे राज्यमार्गावरील संगम क्‍लासिक जवळ 20-20 व्यासापेक्षा मोठे खड्डे आणि सुमारे दोन ते चार फुट खोल खड्डे पडले आहेत. या खड्डयात अनेक उपखड्डे पडले आहेत. त्यातून जाणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे अपघात होत आहेत. दुचाकीवरून अनेक जण पडले आहेत. सायकलवरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या खड्ड्याचा मोठा त्रास होत आहे. या खड्ड्यात गटाराचे पाणी मिक्‍स होत असल्याने त्या घाण पाण्यातून वाट काढतच सर्वांना जावे यावे लागत आहे. दरवर्षी पावसात पाणी साचून हा रस्ता पाण्याखाली जातो. सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे येथील नैसर्गिक प्रवाह पूर्ववत केला जात नव्हते.
या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लाखो लोकांना त्रास होत असताना याकडे अधिकारी वर्गाचे लक्ष नसावे ही अत्यंत खेदाची बाब आहे. यासाठी रोटरी क्‍लब आणि स्थानिक नागरिक, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. वैयक्तिकरीत्या नागरिकांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. सरकारी अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेतात. यामळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत आहे.
राजगुरूनगर-भीमाशंकर या 56 क्रमांच्या राज्यमार्गावरील संगम क्‍लासिक जवळील भागात रस्त्यावर पावसाचे पाणी आणि गटाराचे पाणी साचून राज्यमार्गावर खड्डे पडत असताना त्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आणि राजगुरूनगर नगर परिषद लक्ष देत नसल्याने आज राजगुरूनगर रोटरी क्‍लब, शिवसेना आणि स्थानिक नागरिकांच्या, तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने या खड्ड्यांजवळ जाऊन रस्ता रोको करण्यात आला. या रस्ता रोकोत जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, राजगुरूनगर रोटरी क्‍लबचे अध्यक्ष अविनाश कोहिनकर, श्रीकांत गुजराथी, माऊली करंडे, अविनाश कहाणे, गणेश घुमटकर, नरेश हेडा, प्रवीण वाईकर, सातकर स्थळचे माजी सरपंच अजय चव्हाण, मारुती सातकर, शिवसेनेचे सुदाम कराळे,वामन बाजारे, डॉ मंगल वाडेकर, कैलास दुधाळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे म्हणाले की, येथील खड्डे आणि पाणी रस्त्यावर येत असून पाच वर्षापासून येथील नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करून रस्त्यात पडलेले मोठे खड्डे बुजविण्याची मागणी केली जात आहे. स्थानिक नागरिक, रोटरी क्‍लब आणि शिवसेनेच्या माध्यमातून यासाठी सततचा पाठठपुरावा सुरू आहे. मात्र याकडे अधिकारी लक्ष देत नाहीत. ते कोणाच्या दबावाला बळी पडत आहे याची माहिती आहे. मात्र, जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रयत्न ते जाणून बुजून करीत आहेत. नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी रोटरी क्‍लब आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून आज रास्तो रोको आंदोलन केले आहे. यातून जर मार्ग काढला नाही तर तीव आंदोलन केले जाईल.आता आश्वासने बास काम करा असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केली. येथील खड्ड्यात अपघाताला अधिकारी कारणीभूत राहतील. एखाद्याला जीव गमवावा लागला तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल याचे भान ठेवावे.
डॉ मंगल वाडेकर म्हणाल्या की, या रस्त्यातून जाताना मी स्वतः दोन वेळा पडले आहे. गेली पाच वर्षे मी वैयक्तिक तक्रारी अधिकाऱ्यांकडे केल्या मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नाही. कोणीही आंदोलन केले नाही. मात्र आज सर्व नागरिक एकजुटीने आंदोलनात उतरल्याने आतातरी याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि येथील नैसर्गिक प्रवाह सुरु करून रस्त्यात पडलेले खड्डे दुरुस्त करावेत. या खड्ड्यात पडलेल्या नागरिकांवर उपचार करताना खूप वाईट वाटते. कारण त्यात महिला आणि शाळकरी मुलांचे प्रमाण जास्त आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्यावे. यावेळी माजी सरपंच मारुती सातकर, अजय चव्हाण, वामन बाजारे, सुदाम कराळे यांनी मनोगत व्यक्त केले.दरम्यान येथे आलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याला मागण्याचे निवेदन देण्यात आले.

चौकट
“दैनिक प्रभात’च्या पाठपुराव्याला आले यश
राजगुरूनगर येथे शिरूर-राजगुरूनगर-भीमाशंकर या राज्य मार्गावर संगम क्‍लासिक जवळ पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि बुजवलेल्या नैसर्गिक प्रवाहाबाबत “दैनिक प्रभात’ने सततच पाठपुरावा केला आहे “दैनिक प्रभात’च्या बातम्यांचा प्रभाव आणि पाठपुराव्याची दखल घेत आज अखेर स्थानिक नागरिक, विद्यार्थी, रोटरी क्‍लब व शिवसेना यांच्यामाध्यमातून जवळपास तासभर रस्ता रोको आंदोलन केले. येत्या काही दिवसात यावर अधिकारी मार्ग काढणार असल्याने प्रभातच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)