राजगुरूनगर बसस्थानकात रोडरोमिओंचा घेतला समाचार

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खेड पोलीस ठाण्यात दामिनी पथक बीट मार्शल पथक कार्यान्वित
राजगुरुनगर  -राजगुरुनगर शहरात व तालुक्‍याच्या इतर भागात महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला यांच्या छेडछेडीच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी आणि तालुक्‍यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खेड पोलीस ठाण्यात दामिनी पथक बीट मार्शल पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून आज एसटी स्टॅंडवर आलेल्या रोडरोमिओंचा समाचार घेण्यात आला.
राजगुरुनगर येथे शिक्षण घेण्यासाठी एसटीने येणाऱ्या मुलींची संख्या जवळपास 10 हजारांच्या आसपास आहे. तितकीच संख्या मुलांची आहे. त्यामुळे एसटी स्टॅंडमधून जाणाऱ्या एसटी बसेसची संख्या कमी असल्याने शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. याबरोबर नागरिकांची संख्या मोठी असल्याने एसटीबस अपुऱ्या पडत आहेत. येथील गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी, विद्यार्थी आणि रोड रोमिओ विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार येथे सर्रास घडत असतात. अनेकदा मुलींवरून येथे विद्यार्थ्यांची भांडणे होत होती. याबाबत खेड पोलिसांत तक्रारी दिल्या होत्या. अपुरे पोलीस बळ आणि एसटी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे या प्रकारात वाढ होत होते. याबरोबरच तालुक्‍यात अनेक गुन्हे घडत असताना त्याठिकाणी पोलीस वेळेत पोहचत नव्हते. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत होती. ही परिस्थिती केवळ खेड तालुक्‍यात नव्हती, तर जिल्ह्यात सगळीकडे असल्याने पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी याबाबतच्या गुन्ह्यात लक्ष देत दामिनी पथक आणि बीट मार्शल पथकाची निर्मिती करून त्यांना अत्यावश्‍यक साधने देऊन ही पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.
खेड तालुक्‍यात राजगुरुनगर पोलीस ठाण्यात अंतर्गत बीट मार्शल व दामिनी पथक कार्यान्वित करण्यात आले असून त्याद्वारे तालुक्‍यातील बारिकसारिक घटनांची माहिती घेतली जात आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्यात आले आहे. विविध सण, उत्सव, यात्रा, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे, मंदिर परिसर आदी ठिकाणी ही दोनही पथके विशेष लक्ष देणार आहेत. यासाठी त्यांना दुचाकी वाहन, वायरलेस सेवा, मोबाईल सेवा, अत्याधुनिक शस्र, प्रथमोपचाराच्या सेवा आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. राजगुरुनगर पोलीस ठाण्यांतर्गत बीट मार्शल पथकात राजेश नलावडे, विकास पाटील, अमोल वडेकर, पथकांमध्ये जी. बी. गवारी, सागर हिले, जी. के. मुंढे, कैलास पासलकर यांची तर दामिनी पथकात सुरेखा कजवे, सुगंधा कवडे या पोलिसांची निवड केली असून त्यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील घटनांवर नजर ठेवून आढावा घेऊन वरिष्ठांना सादर केला जात आहे. याबरोबरच एका पोलीस वाहनाच्या माध्यमातून चाकण ते पेठ गावापर्यंत पोलिसांचे फिरते पथक कार्यान्वित केले असून पुणे-नाशिक महामार्गावर होणारे अपघात, लूटमार आणि वाहनकोंडी व गुन्हेगारी यावर नजर ठेवली जात आहे.
दरम्यान आज राजगुरुनगर एसटी स्टॅंडवर कॉलेज सुटल्यानंतर दामिनी पथक व बीट मार्शल पथकातील पोलीसांनी विद्यार्थीनीची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. या परिसरात फिरणाऱ्या रोड रोमिओचा पोलिसांनी समाचार घेतला. सध्या गणपती उत्सव असल्याने हे पथक तालुक्‍यात सर्वत्र फिरत आहे. त्यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न तक्रारी समजून घेतल्या जात आहेत. या पथकांमुळे अनेक घटनांना आळा बसणार आहे. एसटी स्टॅंडवर आज पासून हे पथक येण्यास सुरुवात झाल्याने प्रवासी, महाविद्यालयीन युवतींनी समाधान व्यक्त केले आहे.

  • पथकाचे कार्य…
    या पथकाच्या माध्यमातून राजगुरुनगर एसटी स्टॅंडवर दररोज कॉलेज सुटल्यानंतर लक्ष ठेवले जाणार आहे. येथील गर्दी लक्षात घेता येथे रोड रोमिओ मोठ्या संख्येने असतात त्यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. याबरोबरच बसस्थानकात पाकीट मारीच्या मोठ्या घटना घडत असल्याने त्यावर निगराणी करून त्याचा बंदोबस्त केला जाणार आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरात दामिनी पथक काम करणार असून राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि वाडा रस्ता यावर हे पथक फिरणार आहे. दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर ठोस कारवाई केली जाणार असल्याचे या पथकाचे प्रमुख राजेश नलावडे यांनी सांगितले. तर महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी दामिनी पथक सक्षम असून महिलानाची महाविद्यालयीन विद्यार्थीनिनी त्यांच्या समस्या तक्रारी द्याव्यात असे आवाहन दामिनी पथकातील सुरेखा कजवे, सुगंधा कवडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)