राजगुरूनगर परिसरातील शेतकरी अंधारात

रविवारी झालेल्या वादळी पावसाने अनेक गावांत विजेचे खांब कोसळले : घरांचे, पिकांचे, गोठ्यांचेही मोठे नुकसान

राजगुरुनगर, दि. 1 (प्रतिनिधी) – शहर आणि परिसरात रविवारी (दि. 30 सप्टेंबर)झालेल्या जोरदार वादळी पावसात शेतकऱ्यांच्या घराचे, शेतातील पिकांचे आणि जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने याचे पंचनामे करून शासनाकडे पाठवून त्याची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या पावसामुळे अनेक गावात विजेचे खांब कोसळल्याने शेतकरी रविवारपासून अंधारात आहेत.
राजगुरुनगर परिसरात रविवारी जोरदार वादळी पाऊस झाला होता. या पावसात जोराचे वादळ होते. या वादळात राजगुरुनगर परिसरातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. विजेचे खांब पडल्याने अनेक शेतकरी अंधारात आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घराचे घराजवळ जनावरांसाठी उभारलेले पत्राशेडच्या गोठ्यांचे आणि शेतातील कामगारांसाठी बनवलेल्या सिमेंट पत्र्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे राजगुरुनगर शहर, तिन्हेवाडी, सातकरस्थळ, दोंदे, चांडोली, राक्षेवाडी, होलेवाडी, कडूस, वडगाव-पाटोळे, चास, पाडळी, पांगरी काळेचीवाडी, कोहिनकरवाडी या परिसरात हाहाकार उडाला. सुमारे अर्धा तास झालेला जोरदार वादळी पाऊस नागरिकांनी अनेक वर्षानंतर अनुभवला. या वादळी पावसात अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे पत्रे कौले छप्परे उडाली. जनावरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले. शेतातील विविध प्रकारची झाडे उन्मळून पडली. त्यामुळे शेतातून जाणारे विजेचे खांब पडल्याने शेतात सर्वत्र तारांचे जाळे पसरले आहे. शेतात राहणाऱ्या घरांचा विद्युत पुरवठा बंद झाल्याने अनेक शेतकरी अंधारात आहेत.
राजगुरुनगरच्या पडाळवाडी परिसरात असलेल्या शिवाजी कोकणे व लक्ष्मण कोकणे यांच्या शेतात काम काम करणाऱ्या मजुरांच्या घरावरील पत्रे वादळी पावसात उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. सातकरस्थळ जवळील एका शेतकऱ्याच्या गोठ्याचे पत्रे उडून अंगावर पडल्याने एक दुभती म्हैस जखमी झाली आहे. होलेवाडी परिसरात भीमा नदीजवळ असलेल्या वीटभट्टीचा माल खाली करणाऱ्या ट्रकवर सिमेंटचा विजेचा पोल कोसळला मात्र जीवित हानी झाली नाही. येथील बी. के. लोमटे याच्या घरावरही वीज प्रवाह नसलेल्या वीज खांबाच्या तारा व झाड पडले आहे.

  • कच्चा विटा भिजल्याने नुकसान
    वादळी पावसामुळे राजगुरुनगर शहर, तिन्हेवाडी, सातकरस्थळ, दोंदे, चांडोली, राक्षेवाडी, होलेवाडी, कडूस, वडगाव-पाटोळे, चास, पाडळी, पांगरी काळेचीवाडी, कोहिनकरवाडी या परिसरातील शेतकऱ्यांच्या नगदी पिके आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. बाजरी आणि मका बरोबरच शेतातील उसाचे पिक अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाले आहे. या परिसरात असलेल्या वीटभट्टीधारकांची मोठी धावपळ झाली. वादळी जोराच्या पावसात कच्च्या विटा भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.
    राजगुरुनगर : शहरानजीक असलेल्या शिवाजी कोकणे व लक्ष्मण कोकणे यांच्या शेतात काम करणऱ्या मजुरांच्या घराचे पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)