राजगुरूनगर एसटी आगाराचे काम निकृष्ट

ठेकेदारावर कारवाईची मागणी ः आक्रमक शिवसैनिकांनी काम बंद पाडले
राजगुरुनगर  -येथील एसटी बस आगार नुतनीकरणाचे काम सुरु असताना ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे.
हुतात्मा राजगुरू यांच्या पुणे-नाशिक महामार्गावरील पुतळा त्यामागील राजगुरुनगर एसटी महामंडळाची जागा देण्याला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून 80 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. राजगुरुनगर एसटी बस स्थानकाच्या मोकळ्या जागेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे पुतळे बसविण्यात येणार आहेत. यासाठी शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे यांच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात आली होती. सध्या राजगुरुनगर एसटी आगाराचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. हे नुतनीकरणाचे काम सुरु असतना त्यात मोठा गैरप्रकार होत आहे. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने शिवसेने बंद पाडले आहे. ज्या पक्षाच्या नेत्यांनी या कामाला निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, त्याच पक्षातील कार्यकर्त्यांवर आज आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कारण इतका मोठा निधी मिळूनही बसस्थानकच्या नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. आगारप्रमुखांना या कामाची किंचितशी माहिती नसल्याने आणि ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने त्यांच्या कामकाजावर शंका व्यक्त केली जात आहे. एसटीचे वरिष्ठ अधिकारी या कामाबाबत इतके अनभिज्ञ असतील याची कल्पना न केलेली बरी असे अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.
येथील हुतात्मा राजगुरू यांच्या पुणे-नाशिक महामार्गावरील पुतळा रस्त्यावर असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा राजगुरू प्रेमींना पुणे-नाशिक महामार्गावर रस्त्यावर थांबावे लागत होते. त्यातच कोणी व्हीआयपी व्यक्ती आल्यास संपूर्ण महामार्ग बंद ठेवण्यात येत होता. यामुळे शहरात मोठी वाहतुकीची कोंडी होत होती. यावर पर्याय म्हणून गेली अनेक वर्षांपासून हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यामागे असलेली एसटी महामंडळाची मोकळी जागा मिळण्याची नागरिकांनी मागणी केली होती. पुतळ्यानजीक असलेला महामार्गावरील अरुंद पूल वाहतुकीला मोठा अडथळा ठरत होता. अनेक वर्षे हा प्रस्ताव शासनपातळीवर प्रलंबित होता. मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे यांची भेट घेऊन या संदर्भात नागरिकांनी व शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे यांनी मागणी केली होती. त्यानुसार परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार आढळराव पाटील, आमदार गोरे यांनी त्यांच्या फंडातून 80 लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे.
एसटी आगाराला आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे, उपप्रमुख शिवाजी वर्पे, जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, संपर्क नेत्या विजया शिंदे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख दत्ता कंद, विभाग प्रमुख महेंद्र घोलप, कैलास गोपाळे, एल. बी. तनपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते. त्यांनी बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. यामध्ये अनेक बाबी दर्जाहीन होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार होत असल्याचे समोर आले असून त्यांनी हे काम तत्काळ बंद पाडले. याबाबत लवकरच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली जाणार आहे.
राजगुरुनगर येथील एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला निधी उपलब्ध झाला असून नुतनीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काम सुरु झाल्यानंतर यात हळू हळू भ्रष्टाचार करण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी असलेल्या खिडक्‍या मजबूत असताना देखील त्या काढून हलक्‍या दर्जाचे स्टील वापरून बनविण्यात आल्या आहेत ते बसविण्याचे काम सुरु आहे. याबरोबरच मजबूत भिंती तोडण्याचे काम सुरु आहे. वास्तविक या मजबूत भिंती अजूनही तीस वर्षे टिकतील अशी त्यांची स्थिती असताना ठेकादार आणि एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यातील मिलीभगत असल्याने चांगले काम होत नसल्याचा थेट आरोप खेड व जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. आगार प्रमुखांकडे याबाबत काय पाठपुरावा केला याबाबत त्यांच्याकडे कोणतीच माहिती नसल्याचे आणि ते नवीन बदलून आल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा संपर्क नेत्या विजया शिंदे म्हणाल्या, येथील बस स्थानकाचे नुतनीकरण करण्यासाठी शिवसनेच्या नेत्यांनी निधी उपलब्ध केला आहे. मात्र येथील काम निकृष्ठ होत असल्याने शिवसेनेला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे खपवून घेतले जाणार आहे. गरजेची कामे बाजूला ठेवून दुसरीच कामे केली जात आहेत. त्यामुळे हे काम करू देणार नाही. यात ठेकेदाराने वेळीच सुधारणा करावी अन्यथा हे होऊ देणार नाही. चुकीचे काम होऊ देणार नाही. डेपो अधिकाऱ्यांना या कामाबद्दल माहिती नसल्याने आणि दबाव आहे, त्यामुळे ठेकेदाराचे फावले आहे.

  • …म्हणून काम बंद पाडले
    याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी सांगितले कि, नागरिकांच्या मागणीनुसार 80 लाख रुपयांची तरतूद केली आहे. बस स्थानकात कॉन्क्रीटीकरण करावे. बसस्थानकाला कंपाऊंड करावे, शौचालय अद्ययावत करावे, प्रवासी शेड करण्याची मागणी होती. मात्र गरज नसताना नको ते काम केले आहे. कार्यालयातील दोन वर्षापूर्वी केलेले काम पुन्हा केले जात आहे. बस स्थानकातील जुनी फरशी टिकावू असताना ती काढून टाकण्यात आली आहे. त्यावर अनेक ठिकाणी कॉंक्रीटीकरण केले आहे. खिडक्‍या मजबूत असताना त्या न वापरता नवीन तकलादू खिडक्‍या बसविण्यात आल्याने येथील कोषागारास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. प्रवाशांच्या सोयी सुविधेचे कामे होणे अपेक्षित आहे; मात्र तशी कामे होत नसल्याने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी लवकरच चर्चा केली जाणार आहे. तोपर्यंत हे काम आम्ही बंद पाडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)