राजगुरूनगर आरोग्य यंत्रणेचा कहर

 • नागरिकरणाच्या वाढत्या वेगात आरोग्य केंद्र अद्यापही गळक्‍या इमारतीत

राजगुरूनगर – राजगुरुनगरचे नागरिकरण वेगाने होत असताना व त्याप्रमाणात शहरातील रुग्णांची संख्या वाढलेली असताना अनेक वर्षांपासून येथील आरोग्य यंत्रणेचा तर कहरच झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही एका छोट्याशा आणि जुन्या गळक्‍या इमारतीत सुरू आहे. राजगुरुनगर शहरात सुसज्ज, असे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची गरज आहे. मात्र, याकडे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने हा प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही.
तहसीलदार कचेरीच्या जवळ 1980 च्या दरम्यान हा दवाखाना छोट्या इमारतीत सुरू झाला आहे. खेड तालुक्‍याची राजधानी असलेल्या राजगुरुनगर शहराच्या मध्यवर्ती भागात हे प्राथमिक आरोग्य केंद्र अवघ्या दोन गुंठ्याच्या खोलीत सुरू आहे. येथील दवाखान्याच्या इमारत कधी खाली कोसळेल अशी अवस्था झाली आहे. स्लॅबमधून पाणी गळते आहे. वांरवांर डागडुजीच्या दूरुस्ती केली जाते मात्र, नवीन इमारत मिळत नसल्याने कोंदट व अपुऱ्या जागेत आजही आरोग्य अधिकारी व कर्मचारी गोरगरिबांची सेवा करीत आहेत.
राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज दीडशे ते दोनशेच्या आसपास राजगुरुनगर आणि शहरालगत असेल्या गावातून तपासणी, उपचारासाठी (ओ.पी.डी.) येत असतात. या केंद्रात शहरासह वाड्यावस्त्या मधील जनतेच्या शासकीय आरोग्य योजना राबविल्या जात आहेत. गेली अनेक दिवसांपासून केवळ एकच वैद्यकीय अधिकारी काम करीत आहे. एका डॉक्‍टरकडून दररोज दोनशे लोकांची तपासणी आणि उपचार केले जात आहेत अजून एका डॉक्‍टरची येथे आवश्‍यकता असताना नवीन डॉक्‍टर येथे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात आजारी रुग्णांना बसायला जागा पुरात नाही. उपचारासाठी स्वतंत्र रुम नसल्याने पुरुष आणि महिलांवर एकत्र उपचार करावे लागतात. प्रसुती झालेल्या महिलांना कोंदट अंधाऱ्या रुममध्ये रहावे लागते. शौचालयाचा वापर एकत्र करावा लागतो. त्यामुळे महिलांची कुंचबणा होत असते. पार्किंग व्यवस्था नसल्याने गाड्या रस्यावर लावाव्या लागतात. कर्मचाऱ्यांना दररोजच्या कामकाजाला पुरेशी जागा नसते. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अपुऱ्या इमातीमुळे होत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या मुळ इमारतीच्या जागेवर नवीन इमारत बांधणे जागेअभावी शक्‍यच नसल्याने या आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम रखडले आहे. पर्यायी जागा नसल्याने शहरात आरोग्य केंद्र होणार नसल्याने भविष्यात शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र शहराबाहेर जाण्याची शक्‍यता आहे.त्यामुळे रुग्णाचे हाल होणाचे प्रमाण वाढणार आहे.

 • अधिकाऱ्यांसह कर्मचारी घरून करतात कामकाज
  खेड तालुक्‍यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी राजगुरुनगरचे आरोग्य केंद्राला निवासस्थाने नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी स्वतःच्या घरी राहून कामकाज करीत असतात. त्यामुळे तातडीची प्राथमिक उपचार सेवा सर्वसामन्यांना मिळणे दुरापास्त आहे. आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा मिळवायची असेल तर फोनवरुन कर्मचाऱ्यांना बोलवावे लागत असते. या दवाखान्याशेजारीच पोलिसांची निवासस्थाने बंद अवस्थेत गेली अनेकवर्षापासून वापराविना पडून आहेत. ही जागा पडीक आहे. या जागेत झाडे झुडपे आणि डुक्करांचे कुत्र्यांचे निवासस्थान बनले आहे. इमारत आंतर बाह्य भिंती खराब झाल्या आहेत. याचात्रास आरोग्य केंद्रातील रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत होई तोपर्यंत तरी पशुसंवर्धन विभागाच्या इमारतीत तात्पुरता आरोग्य केंद्राचा काही विभाग हलवला तर रुग्णांची आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय अडचण दूर होणार आहे. जिल्हा परिषद आणि शासन विभाग वेगवेगळे जरी असले, तरी परवानगी बाबत अधिकाऱ्यांसह नेतेमंडळी उदासीन दिसत आहे. आरोग्य अधिकारी यांचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सततच पाठपुरावा असतो मात्र, याकडे लक्ष दिले जात नसल्याने ही मोठी शोकांतिका आहे.
 • आरोग्यातही आडवे येते राजकारण
  राजगुरुनगर शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वतःची जागा उपलब्ध होत नसल्याने आरोग्य केंद्राला इमारत होणार नाही इमारत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होणार आहेत. याकडे जिल्हा आरोग्य विभाग नगर परिषद यांचे दुर्लक्ष होत आहे. रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत असून त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे सुविधांभावी हाल होत आहेत. सध्या असलेल्या आरोग्य केंद्राजवळ कोट्यवधी रुपयांची पशुसंवर्धन विभागाची नवीन प्रशस्त इमारत आहे. येथे मात्र उपचारासाठी प्राण्याची संख्या अगदी बोटावर मोजण्यापर्यंत आहे. त्यामुळे ही इमारत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वापरता येण्यास हरकत नाही. मात्र, यातही राजकारण येत असल्याने शहरातील आरोग्याचा प्रश्‍न सुटण्यास विलंब होत आहे.
 • आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज
  राजगुरूनगर येथील आरोग्य केंद्रात अजून एक वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज आहे. कर्मचारी मुबलक असलेल तरी दवाखान्यात स्वतंत्र इंजेक्‍शन खोली नाही, अपघात व तातडीच्या सेवा देण्यासाठी वेगळा कक्ष नाही, ऑपरेशन थिएटर नाही. रुग्णांच्या सोबत आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी जागे अभावी सोय नाही. रक्‍त लगवी आदी चाचण्या करण्यासाठी एका जुन्या इमारतीत सोय करण्यात आली आहे आंतर व बाह्य रुग्णांची संख्या जास्त असताना अपुऱ्या जागेची मोठी समस्या सतावत आहे.
 • 25 ऐवजी केवळ आठच बेड
  राजगुरुनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 जानेवारी ते आजपर्यंत 16 हजार 702 बाह्य रुग्ण तर 851 आंतर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. 96 महिलांची आतापर्यंत कुटुंब कल्याण अंतर्गत ऑपरेशन केली आहेत. पुरेशी जागा नसताना आहे. त्या प्ररीस्थितीत 33 महिलांची प्रसूती केली आहे. कुत्रा चावलेल्या 306 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर 808 नवमाताची तपासणी केली आहे.या केंद्रात केवळ 8 बेड असल्याने रुग्णांची गैरसोय होते येथे संख्येनुसार 25 बेडची गरज आहे.

शहरातील व शहराबाहेरील रुग्णाची संख्या मोठी आहे. दररोज दीडशेपेक्षा जास्त ओपीडी होते. इमारत छोटी असल्याने रुग्णांची बसण्यासाठी आणि उपचारासाठी गैरसोय होते. आरोग्य केंद्राची इमारत जुनी झाली आहे. नव्या इमारतीची अथवा शासनाच्या दुसऱ्या पर्यायी जागेत दवाखाना सुरू झाल्यास रुग्णांवर सर्वोपचार करणे सोपे जाईल. त्यांना तेथे उपचार घेण्यास संकोच वाटणार नाही. शहरात प्रसुतीच्या महिलांचे प्रमाण जास्त आहे मात्र, येथील इमारत आणि त्यातील आवश्‍यक वातावरण त्यांना सेवा देण्यास अडचणीचे होत आहे.
– डॉ. उदय पवार, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र, राजगुरूनगर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)