राजगुरूनगरला दोन दिवसांचाच पाणीसाठा

राजगुरूनगर-शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात आला असून पाणी दूषित झाले आहे. शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने चासकमान धरणातून पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
राजगुरूनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यात दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. बंधाऱ्यातील पाणी संपल्याने तळाशी राहिलेले पाणी दूषित झाले आहे. हे दूषित पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येथे तेथे ते शुद्ध केले जाते. दूषित पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्धीकरण होण्यासाठी जात असल्याने जलशुद्धीकरण प्रकल्पास धोका पोहचण्याची भीती निर्माण झाली आहे. दूषित पाण्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प नादुरुस्त झाला तर राजगुरूनगरवासीयांना पुन्हा काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला लागणार आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. असे असताना चास कमान धरणातून पाणी खाली सोडले जात नसल्याने राजगुरुनगर शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने आणि पिण्याचे पाणी शहरातील नागरिकांना अपुरे आणि अस्वच्छ मिळत असल्याने चास कमान धरणातून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. याबाबत नगर परिषदेच्या वतीने चास कमान धरण प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे मात्र अद्यापी त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही. याबाबत पालक मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केदारेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी केली आहे, दोन दिवसांत राजगुरुनगर शहरासाठी चास कमान धरणातून पाणी खाली सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

  • थेट पाणीपुरवठा योजनेबाबत चालढकल
    राजगुरुनगर शहराला पिण्याचे मुबलक आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी चासकमान धरणातून थेट पाणी पुरवठा करावा अशी नागरिकांची मागणी आहे. त्यातूनच नगरपरिषदेने चासकमान धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडे सुमारे 35 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र हा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी शासन दरबारी पडून आहे. पाण्याची योजना मंजूर झाली तर शहरातील मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र शासन पातळीवर त्यास वेळेत मान्यता मिळत नसल्याने या योजनेत चालढकल होत आहे. नगरपरिषदेकडून याचा पाठपुरावा सुरु आहे; मात्र त्यास अद्यापही यश आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)