राजगुरूनगरमध्ये पुन्हा मेगाब्लॉक!

राजगुरूनगर-राजगुरुनगर शहरात आज पुन्हा वाहतूक कोंडी झाल्याने अनेक नागरिक, प्रवासी यांना कडक उन्हात वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. राजगुरुनगर शहरातील वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीचा येथे प्रवाशांना सामना करावा लागत असून, बाह्यवळण रस्त्याचे काम सरकारने रेंगाळत ठेवल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आज राजगुरुनगर शहराच्या दोन्ही बाजूकडून चार-चार किलोमीटर अशा जवळपास किलोमीटरपर्यंत आठ रांगा लागल्या होत्या. राजगुरुनगर शहरात आतापर्यंतचा सर्वांत मोठा मेगाब्लॉक झाला.
राजगुरुनगर शहरात वाहतूक कोंडीचे सुप्रसिद्ध ठिकाण बनले आहे की काय? असा प्रश्न पुणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वारंवार पडत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्या उन्हाळा आणि उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आणि त्याच प्रमाणात लग्न सराई असल्याने पुणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. याबरोबरच या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहने वाहतूक करीत असल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. तर राजगुरुनगर येथील अरुंद पूल वाहतुकीच्या कोंडीचा अडसर बनला आहे. वाहतूक पोलीस कोंडी हटविण्यासाठी जीवावर उदार होऊन प्रयत्न करीत आहेत. वाहन चालकांचा त्रास सहन करीत वाहतूक पोलीस भरउन्हात वाहतूक कोंडी सोडवत असतात मात्र त्यांना देखील कोंडी सुटत नसल्याने पोलीस हतबल झाले आहेत.
वाहतूक कोंडी हा या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिक आणि प्रवाशांसाठी मोठ्या डोकेदुखीचा प्रश्न बनला आहे. यावर उपयायोजना होतच नाही त्यामुळे आणखी किती दिवस नागरिकांना आणि प्रवाशांना छळणार? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. पोलीस यंत्रणेकडून याबाबत सार्वजनिक बांधकामविभाग आणि महामार्ग रस्ते प्राधिकरण यांच्याशी पाठपुरावा केला जात नसल्याने आणि स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष घालीत नसल्याने शहरातील वाहतूक कोंडी सुटत नाही. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने पुणे-नाशिक येथे उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. तर नोकरदार वर्गाला आणि विद्यार्थी वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  • अशी सुटू शकते कोंडी…
    राजगुरुनगर शहरातील अरुंद पूल आणि त्यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय ठरणार आहे तो महामार्गावर चांडोली ते थिगळस्थळ पर्यंत सिमेंटचे डिव्हायडर बसविणे. नाशिक बाजूकडे आगारातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसेसचा मार्ग बदलावा. या दोन उपाययोजना केल्यास शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. मात्र याकडे महामार्ग प्राधिकरण विभागाचे अत्यंत दुर्लक्ष असल्याने वाहतूक कोंडीवर उपाययोजना होत नसल्याने दिवसेंदिवस ती वाढत आहे.
  • बाह्यवळणासाठी किमान तीन वर्षे जाणार
    बाह्यवळण रस्त्याचे घोंगडे अजून किती दिवस भिजत ठेवणार, हा प्रश्न सतावत आहे. बाह्यवळण रस्त्याचे काम मार्गी लावण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासकीय अधिकारी लक्ष देत नाहीत. बाह्यवळण रस्त्यातील वाद-विवाद सोडवण्यास विलंब लावत आहेत. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नाही. अजूनही किमान तीन वर्षे बाह्यवळण ररस्ता होण्यास लागणार असल्याने तीन वर्षे वाहतूक कोंडीचा सामना येथील नागरिकांनी आणि महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना करावा लागणार आहे. तूर्तास तरी या महामार्गावर वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न सरकारकडून होणे गरजेचे झाले आहे.
  • …म्हणून होते वाहूककोंडी
    राजगुरुनगर शहरातील वाहतूक कोंडी येथील शहरातील अरुंद पुलामुळे होते. केवळ पूलच जबाबदार नाही तर वाहतूक कोंडी करण्यास बेशिस्त वाहनचालक जबाबदार आहेत. राजगुरुनगर शहरातील अरुंद पुलाजवळ दोन्ही बाजूकडून वाहन चालक चार चार रांगा करत येतात पुढे अरुंद पुलावर सिंगल वाहतूक आहे, हे माहिती असताना पुढे जाण्यासाठी मोठी स्पर्धा करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. या कारणासह येथे अरुंद पुलाजवळ नाशिक बाजूकडे जाणाऱ्या एसटी बस स्थानकातील बसगाड्या बाहेर पडत असल्याने वाहतुकीला अडथळा बनत आहेत. त्या पाबळ चौकातून बाहेर काढल्यास ही समस्या काही प्रमाणात सुटेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)